Pimpri News: ‘स्पर्श’वरुन आता अधिकाऱ्यांमध्येच जुंपली !

लिपिक, आरोग्य अधिकारी खोटेपणा करत असल्याचा अतिरिक्त आयुक्तांचा आरोप

एमपीसी न्यूज – एकाही रुग्णावर उपचार न करता कोविड केअर सेंटरची खोटी बीले सादर करणाऱ्या स्पर्श हॉस्पिटल प्रशासनावर सर्व स्तरातून टीका होत असताना प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार केविलवाण्या पद्धतीने स्पर्शची पाठराखण करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्पर्शचा कारभार पारदर्शक असल्याचे सांगत विरोधात टिप्पणी लिहिणारे लिपिक आणि आरोग्य अधिकारी खोटेपणा करत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

एकाही रुग्णावर उपचार केले नसताना स्पर्शला 3 कोटी 29 लाख 40 हजार रुपये बिल अदा केल्याचे त्यांनी खुलाशात मान्य केले आहे. दरम्यान, स्पर्श संस्थेचे सीसीसी सेंटर महापालिकेतील एक नगरसेवक चालवत असल्याचेही पवार यांनी सांगितले.

भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या ठिकाणी कार्यान्वीत करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये एकही रुग्ण दाखल झालेला नसताना स्पर्श हॉस्पिटलचे डॉ. अमोल हळकुंदे यांच्यामार्फत तब्बल 5 कोटी 26 लाख 60 हजार 800 रुपयांची बीले महापालिकेला सादर केल्याचा धक्कादायक प्रकार प्रशासकीय टिप्पणीतून उघडकीस आला होता.

या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी संबधीत लिपिकाला कारणे दाखवा नोटिस बजावली. तसेच त्याला रात्री उशिरापर्यंत महापालिकेत बसवून ठेवले. त्यावर पवार यांनी खुलासा केला असून महापालिका लिपिक आणि आरोग्य अधिकारी यांच्यावर खोटारडे पणाचा आरोप केला आहे.

सीसीसी सेंटरसाठी महापालिका प्रभारी अतिरिक्त आयुक्त आणि आरोग्य विभागाने स्पर्श संस्थेला 5 ऑगस्ट 2020 रोजी मान्यता दिली. 7 ऑगस्ट 2020 रोजी 90 दिवसांसाठी कामकाज सुरू करण्याचे लेखी आदेश देण्यात आले. त्यानुसार 12 ऑगस्ट 2020 रोजी करारनामा करण्यात आला.

दरम्यान, ऑक्टोबर 2020 पासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. त्यामुळे 15 ऑक्टोबर 2020 पासून काही कोविड केअर सेंटर टप्प्या-टप्प्याने बंद करण्यात येऊ लागले. मात्र, स्पर्श संस्थेला कारारनाम्यानुसार 90 दिवसांच्या कामाचा आदेश देण्यात आला होता.

एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) मधील अटी शर्तीनुसार कोविड सेंटरधारकांना 80 टक्के बिले देण्याची हमी देण्यात आली होती. त्यामुळे ही बिले कशी अदा करावी याचे धोरण ठरविण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली. त्यानुसार त्यांनी संबंधित सेंटरला भेटी देऊन तेथील सोयी सुविधांबाबत योग्य ती खात्री करून घेतली.

एकही रुग्णावर उपचार केले नसताना 3 कोटी रुपये अदा केल्याची प्रशासनाकडून कबुली

रुग्ण संख्या कमी झाल्याने स्पर्श संस्थेच्या सेंटरला 90 दिवसांपर्यंत एकही रुग्ण महापालिका पुरवू शकली नाही. त्यामुळे अशा सेंटरला 80 टक्क्या ऐवजी 65 टक्के बिल अदा करण्याचे धोरण ठरविण्यात आले. ‘इओआय’मधील अटींनुसार स्पर्श संस्थेला 80 टक्के प्रमाणे 5 कोटी 26 लाख 60 हजार 800 रुपये द्यावे लागले असते.

मात्र, महापालिकेने जेवणाचे व औषधांचे पैसे वजा करून 3 कोटी 29 लाख 40 हजार रुपये बिल अदा केले आहे. एकूणच या प्रकारात महापालिकेचे 1 कोटी 97 लाख 20 हजार 800 रुपयांची बचत झाल्याचा दावा केला आहे. परंतु, एकही रुग्णावर उपचार केले नसताना 3 कोटी रुपये अदा केल्याचे प्रभारी अतिरिक्त आयुक्तांनी मान्य केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.