Pimpri News: महापालिकेच्या 7 हजार 112 कोटीच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजूरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2021-22 या आर्थिक वर्षांचा मूळ 5 हजार 588 कोटी 78 लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार 112 कोटी 1 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला महासभेने आज (बुधवारी) अंतिम मान्यता दिली. या अर्थसंकल्पाची उद्या 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2021-22 या आर्थिक वर्षांचा मूळ 5 हजार 588 कोटी 78 लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार 112 कोटी 1 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश पाटील यांनी 18 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला सादर केला होता. त्याला स्थायी समितीने 250 कोटी रुपयांच्या उपसूचना देत 24 फेब्रुवारी रोजी मान्यता दिली.

या अर्थसंकल्पावर 26 मार्च रोजी महासभेत चर्चा झाली. चर्चेअंती सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपसूचना स्वीकारण्यात आल्या. 1 मूळ उपसूचना दिली होती. त्याला 373 पोट उपसूचना दिल्या होत्या. तसेच विविध नवीन कामांचा समावेश केला होता.

या उपसूचना ग्राह्य, अग्राह्य करण्यासाठी महासभा तहकूब केली होती. ही तहकूब सभा आज (बुधवारी) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.

लेखा विभागाने ग्राह्य, अग्राह्य केलेल्या उपसुचनांचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी वाचन केले. 236 उपसूचना ग्राह्य तर 137 उपसूचना अग्राह्य असल्याचे त्यांनी जाहीर केले. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी ग्राह्य उपसूचना स्वीकारल्या असून अर्थसंकल्पाला मान्यता देण्याची विनंती केली.

त्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी सन 2021-22 या आर्थिक वर्षांचा मूळ 5 हजार 588 कोटी 78 लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार 112 कोटी 1 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर झाल्याची घोषणा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.