Pimpri News : खासगी फायनान्स कंपनी व बँकांच्या जाचातून गरीब कर्जदारांची सुटका करा – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – खासगी फायनान्स कंपनी व बँकांच्या जाचातून गरीब कर्जदारांची सुटका करा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे. कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी खासगी फायनान्स कंपन्या ग्राहकांना धमकावत असल्याचा आरोपही नाईक यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. ‘कोरोना साथीमुळे गोरगरीब आर्थिक विवंचनेत आहे. पण, कर्जाचे हफ्ते वसुल करण्यासाठी ग्राहकांना दमदाटी केली जात आहे. अनेक फायनान्स कंपन्यांनी नामचीन गुन्हेगारांना वसुलीच्या एजन्सी दिल्या आहेत. या प्रकरणी पोलीस देखील लक्ष घालत नसल्याने या फायनान्स कंपन्या व त्यांनी पोसलेल्या गुंडांचे फावले असल्याचे नाईक यांनी निवेदनात नमूद केले आहे.

‘अनेक प्रमाणिक गोर-गरिबांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ हवी आहे. यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. विजय मल्ल्या सारखे लोक कर्ज बुडवून परदेशात पळून जातात. पण हातावर पोट असणाऱ्या गरीबांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ दिली जात नाही. अशा फायनान्स कंपन्यांचे व्यवसाय परवाने रद्द करा; अन्यथा गरीब कर्जदारांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरु,’ असा इशारा प्रदीप नाईक यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.