Pimpri News: नागरिकांना कोरोना लस मोफत द्या – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही कोरोना लस मोफत देण्यात यावी. त्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,  संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट आहे. या विषाणूने भारतातही शेकडोंचा जीव घेतला आहे. या घातक आजारापासून बचाव व्हावा म्हणून शास्त्रज्ञांनी लस तयार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही लस नागरिकांना दिली जात आहे.

पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना ही लस देण्यात आली. कोरोना योद्ध्यांना लस मोफत देण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. देशभरात ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

यानंतर सामान्य नागरिकांना लस देण्यास सुरूवात होईल. त्याची तयारीही प्रशासकीय स्तरावर केली जात आहे. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडूनही तयारी करणे गरजेचे आहे. ही तयारी करत असताना पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना कोरोना लस मोफत देण्याची गरज आहे. कोरोना आजाराच्या फैलावाला कायमचा प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक माणसाला कोरोना लस टोचणे महत्त्वाचे आहे.

उद्योगनगरीतील एकही व्यक्ती कोरोना लसीपासून वंचित राहू नये, सामान्य माणसावर कोरोना लसीच्या खर्चाचा भुर्दंड पडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढाकार घेऊन ही लस मोफत देण्याचा निर्णय घ्यावा. त्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी सूचना आमदार जगताप यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.