Pimpri News: कल्याणकारी योजनांच्या अर्जांना एक महिन्याची मुदतवाढ द्या – शर्मिला बाबर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राबविल्या जाणा-या कल्याणकारी योजनांचे अर्ज सादर करण्यासाठीची मुदत 25 नोव्हेंबर रोजी संपली आहे. आणखी असंख्य लाभार्थी या योजनांचे अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे योजनांचे अर्ज करण्यास आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात नगरसेविका बाबर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत, महिला बालकल्याण, मागासवर्गीय, अपंग कल्याणकारी व इतर योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

या योजनांसाठी अर्ज वाटप व स्वीकृतीसाठी 26 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2020 हा कालावधीत देण्यात आला होता. ही मुदत बुधवारी संपली असून आणखी असंख्य लाभार्थी या योजनांचे अर्ज भरण्यापासून वंचित आहेत.

शिष्यवृत्ती, अर्थसहाय्याच्या योजनांसाठी असंख्य कागदपत्रे लाभार्थ्यांना जमा करावी लागतात. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थी, लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे जमा करण्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना अर्ज भरता आलेले नाहीत.

पालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या लोककल्याणकारी योजनांपासून कोणी वंचित राहून नये. ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे पालिकेने कल्याणकारी योजनांचे अर्ज करण्यासाठी आणखी महिनाभर मुदतवाढ द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.