Pimpri News: दररोज 50 ते 100 डोसचे टोकन द्या, नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचे नियोजन योग्य नाही. नागरिक नगरसेवकांकडे येतात. नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. यासाठी प्रत्येक नगरसेवकांना दररोज 50 ते 100 डोसेसचे टोकन द्यावेत, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात महापौर उषा ढोरे यांनी क्षेत्रातील पदाधिकारी, नगरसदस्य यांची स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, अतिक्रमण, वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवकांनी डोससचे टोकन देण्याची मागणी केली.

उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, प्रभाग अध्यक्ष विकास डोळस, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, नगरसदस्य सागर गवळी, नगरसदस्या भिमा फुगे, निर्मला गायकवाड, प्रियंका बारसे, सोनाली गव्हाणे, विनया तापकीर, सुवर्णा बुर्डे, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ. शिवाजी ढगे, उपअभियंता मनिष चव्हाण, लता बाबर, प्रेरणा सिनकर, संदेश खडतरे, विजय वाईकर, प्रशासन अधिकारी नाना मोरे, राजेश वाघ, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

दिघी येथील स्मशानभूमीमध्ये पावसाळ्यात नदीचे पाणी शिरते याबाबत स्मशानभूमी अन्यत्र स्थलांतरीत करण्यात यावी. दिघीमध्ये प्रशस्त उद्यान करणे आवश्यक आहे. स्थापत्य विषयक कामे संथगतीने चालू आहेत. दिघीमध्ये जुन्या जकातनाक्याच्या इमारतीत महापालिकेचा छोटा दवाखाना आहे. तेथे बालकांचे लसीकरणाचे काम चालते तथापि शेजारी स्मशानभूमी असल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. दिघी आळंदी मार्गावर प्रशस्त पालखी मार्ग तयार करण्यात आलेला आहे. मात्र, तेथे भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. त्याचा पादचाऱ्यांना त्रास होण्याबरोबरच वाहतूक कोंडी आणि अपघाताची समस्या निर्माण होत आहे. विद्युत केबलचे अंडरग्राऊंडचे कामात दुरुस्ती करावी लागत आहे. केबल तुटणे, विजपुरवठा खंडीत होणे यासारखे प्रकार घडत आहेत. अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर स्पीड ब्रेकरची गरज आहे. चऱ्होली भागात सुसज्ज रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. नाल्यामध्ये पाणी साचत असल्याने नाल्याची खोली वाढविणे, डी.पी. बॉक्स सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, ड्रेनेज समस्या, रस्तारुंदी अशा सूचना नगरसेवकांनी केल्या.

स्थानिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या – महापौर
बैठकीत प्राप्त सूचना आणि विषयांबाबत महापौर ढोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. महापौर ढोरे म्हणाल्या, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले असेल तरच शहराच्या विकासाचा उपयोग आहे. याकरिता वैद्यकीय विभागाने लसीकरण मोहिम राबविताना दक्षता घ्यावी व सर्वांना लस मिळावी यासाठी सुयोग्य नियोजन करावे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. त्याला प्राथमिकता देणेत यावी. यासाठी सर्वांचे लसीकरण करुन घ्यावे. वैद्यकीय विभागाने लसीकरण मोहिमेत सुरळितपणा आणण्यासाठी प्रयत्न करावेत. स्थानिक नागरिकांना लसीकरण करण्याबाबत प्राधान्य देण्यात यावे.

लोकप्रतिनिधींच्या प्रश्नाबाबत सर्व संबंधितांनी कृती आराखडा तयार करावा. रस्ते व पदपथांवरील अतिक्रमण समस्या भूमिगत केबल, डी.पी.बॉक्स जागा बदलणे, दिघी स्मशानभूमी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक त्या ठिकाणी अपघात टाळण्याकरीता स्पीड ब्रेकर बसविणे याबाबत तातडीने कार्यवाही करावी.

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी विकासकामे लवकर होण्याच्या दृष्टीने संबंधितानी प्रस्ताव सादर करावेत. सदस्यांना त्यांनी उपस्थित केलेल्या कामाबाबत वेळोवेळी परिस्थिती नमूद करावी. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वय ठेऊन लोकप्रतिनिधींचे प्रश्न सोडवावेत असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.