Pimpri News: थेट पद्धतीने काम देणे पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना भोवले

एमपीसी न्यूज – थेट पद्धतीने एकाच एजन्सीला काम देणे, सदस्यपारित ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम अधिका-याची मान्यता न घेणे आणि खर्चाची मर्यादा ओलांडणे पिंपरी पालिकेच्या कार्यकारी उपअभियंता व लेखाधिका-याला भोवले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तीन अधिका-यांना ‘सक्त समज’ दिली आहे. तसेच भविष्यात कर्तव्यात कसूर केल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, उपअभियंता सुर्यकांत मोहिते आणि लेखाधिकारी रमेशकुमार जोशी अशी सक्त समज दिलेल्या अधिका-यांची नावे आहेत.

पिंपरी महापालिकेतर्फे ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 15 मधील भक्ती-शक्ती येथे 18, 19 फेब्रुवारी 2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वानिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मंडप विषयक काम मे. ऑथरॉन टेक्नॉलाजीस अन्ड एंटरप्रायजेस यांना देण्याच्या झामाबाई बारणे आणि राजेंद्र लांडगे यांच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने 17 फेब्रुवारी रोजी मान्यता दिली.

तथापि, सदस्य पारित ठरावाची अंमलबजावणी करण्याकरिता सक्षम अधिका-यांची पूर्वसंमती अथवा मान्यता घेतली नाही. कोणत्याही प्रकारची विहित कार्यपद्धती न अवंलबिता थेट पद्धतीने कार्यवाही केल्याचे आणि एकाच एजन्सीला काम केल्याचे निदर्शनास आले.

सालाबादाप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे असतानाही स्थापत्य विभागाने विहित कार्यपद्धतीचा अवलंब केला नाही. अगोदर निविदा प्रक्रियेची कारवाई करणे आवश्यक व अभिप्रेत असताना तशा स्वरुपाची कार्यवाही झाली नाही. याप्रकरणी या तीन अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती.

श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्वासाठी प्रतिवर्षी केवळ एका दिवसासाठी पाच हजार आसन क्षमतेसह मंडप व्यवस्था करण्यात येते. यावर्षी मात्र दोन दिवसासाठी आठ हजार आसन क्षमतेसह मंडप व्यवस्था करावी लागल्याने खर्चाची मर्यादा जास्त झाली असे अधिका-यांनी खुलाशात म्हटले आहे.

हे काम संवेदनशिल, तातडीचे असल्याने लघुत्तम दराने करण्यात आल्याचा खुलासा काही अंशी संयुक्तिक असला, तरी सरकारने निर्गत केलेल्या सुचनांचे, निर्णयाचे पालन केलेले दिसून येत नाही. कर्तव्यात कसूर केली आहे.

काम संवेदनशील असल्याने थेट पद्धतीने वेळेच्या अभावी केल्याची बाब विचारात घेत एकवेळ संधी म्हणून पवार, मोहिते, जोशी यांना सक्त समज देण्यात आली आहे.

यापुढे कार्यालयीन कर्तव्य पार पाडताना सरकारने निर्गत केलेल्या सुचनांचे, परिपत्रकांचे, शासन निर्णयांचे काटेकोरपणे पालन करावे. यामध्ये अनियमितता आढळल्यास अथवा कर्तव्यात कसूर केल्याची बाब निदर्शनास आल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.