Pimpri News: पाणी पुरवठ्याच्या 100 कोटींच्या निविदेत गोलमाल?

एमपीसी न्यूज – आंद्रा – भामा आसखेड धरणातून 100 एमएलडी पाणी आणण्याचा प्रकल्प कागदोपत्री असताना पिंपरी – चिंचवड महापालिकेने 27 किलोमीटर अंतरावर जलवाहिनी टाकणे आणि 16 पाण्याच्या टाक्या (जलकुंभ) उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

या कामासाठी 103 कोटी 15 लाख 27 हजार 187 रुपयांच्या दोन निविदा अंतिम केल्या आहेत. त्यापैकी 100 कोटींच्या निविदेत ठेकेदारांचे संगनमत झाल्याचे दिसून येत असून निविदेत स्पर्धाच झालेली नाही. दोन्ही निविदांसाठी ठेकेदारांनी जादा दर सादर केले आहेत. त्यामुळे महापालिकेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे या निविदेत गोलमाल झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आणि पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत आंद्रा धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यास कालावधी लागण्याची शक्यता असल्याने देहू – बोडकेवाडी बंधाऱ्याजवळ 100 दशलक्ष लिटर क्षमतेचे अशुद्ध जलउपसा केंद्र बांधणे आणि चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत रायझिंग मेन टाकण्याचा पर्याय पाटबंधारे विभागाकडून सुचविण्यात आला आहे. शहरात नव्याने विकसित होणा-या चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी आणि मोशी परिसरासाठी या पाण्याचा वापर होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेने आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या कामासाठी नागपूरस्थित ‘डीआरए कन्सल्टंट’ यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. त्यांनीच पिंपरी – चिंचवड शहराच्या विविध भागात 27 पाण्याच्या टाक्या बांधणे आणि 55 किलोमीटर अंतरावर जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा आराखडा तयार केला आहे. 4 पॅकेजेस निश्चित करत 201 कोटी 52 लाख 65 हजार 323 रुपये खर्चाचे अंदाजपत्रकही तयार केले आहे. या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता घेऊन या कामाची निविदा 18 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या निविदा 31 जानेवारी 2020 रोजी उघडण्यात आला.

त्यात ठेकेदारांनी ‘रिंग’ केल्याचे पुढे आले आहे. त्यापैकी पहिल्या आणि चौथ्या पॅकेजमधील कामांच्या निविदा स्थायी समितीसमोर ठेवण्यात आल्या. मात्र 100 कोटींच्या निविदेत ठेकेदारांचे संगनमत झाले असून निविदेत स्पर्धाच झालेली नाही. दोन्ही निविदांसाठी ठेकेदारांनी जादा दर सादर केले असून त्यामुळे महापालिकेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे गोलमाल झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या निविदांचा विषय तहकूब ठेवण्याची नामुष्की स्थायी समितीवर ओढविली आहे .

दरम्यान, पाणी पुरवठा कामाची विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या आणि चौथ्या पॅकेजमधील कामांच्या निविदा स्थायी समितीसमोर ठेवण्यात आल्या आहेत.अशी कामाची विभागणी करून भूलभुलैय्या निमार्ण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पहिल्या पॅकेजमध्ये आठ ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. तसेच या टाक्या भरण्यासाठी नव्याने जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

त्यामध्ये गुडविल कन्स्ट्रक्शन यांनी इतर ठेकेदारांपेक्षा त्यांचा दर कमी असल्याने त्यांची निविदा स्विकृत करण्यात आली. त्यानुसार, या कामासाठी एकूण 48 कोटी रूपये खर्च होणार आहे. तर चौथ्या पॅकेजमध्ये आठ ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधणे आणि नव्याने जलवाहिनी टाकण्यात येणार आहेत. त्यामध्ये एस. एस. साठे यांनी निविदा सादर केली. त्यांचा दर कमी असल्याने निविदा स्विकृत करण्यात आली. निविदेत स्पर्धाच झाली नसताना ती अंतिम करण्यात आली आहे. या कामासाठी 52 कोटी खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.