Pimpri News : शासनाने पुण्यात 100 टन क्षमतेचा ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प उभारावा – संदीप बेलसरे

एमपीसी न्यूज – शासनाने कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा 80 टक्के वरुन 20 टक्के पर्यंत कमी केला कोरोना रुग्णांना प्राधान्याने ऑक्सिजनचा पुरवठा व्हायला हवा परंतु, याचा अर्थ उद्योगांचा ऑक्सिजन काढून घेणे हा पर्याय होत नाही, उद्योग क्षेत्राला होणारा ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुण्यात प्रतिदिन 100 टन पेक्षा जास्त ऑक्सिजनचे उत्पादन व पुरवठा करणारी यंत्रणा युद्ध पातळीवर उभी करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केली आहे. 

संदीप बेलसरे यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सात सप्टेंबर रोजी अधिसूचना काढून 80 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णालयांना व 20 टक्के उद्योग क्षेत्राला करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 रुपये प्रतिघन मीटरने मिळणारा ऑक्सिजनचा सिलेंडर 140 रुपये प्रतिघन मीटर झाला.

आज रोजी काळ्या बाजारात 800 रुपये ते 1000 रुपये मोजून ऑक्सिजनचा सिलेंडर उद्योजकांना घ्यावा लागत आहे.  दुप्पट, तिप्पट दर देऊन सुद्धा ऑक्सिजनचा सिलेंडर उपलब्ध होत नाही. विशेष म्हणजे त्यावर कोणत्याही शासकीय नियंत्रण नाही, असे बेलसरे यांनी म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड,चाकण, तळेगाव या औद्योगिक परिसरात सुमारे 35 हजार सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठे उद्योग आहेत. त्यामध्ये फॅब्रिकेशन, प्रोफाईल कटिंग, ॲटो मोबाईल, रबर, प्लास्टिक आदि उद्योगाचा समावेश होतो ज्यांना ऑक्सिजनचा सिलेंडरची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते . साधारणपणे 380 ते 400 टन ऑक्सिजनची आवश्यकता दररोज असते. त्यामुळे 80 टक्के ऑक्सिजन उद्योगांना व 20 टक्के ऑक्सिजन रुग्णालयांना करण्यात येत होता, याकडे बेलसरे यांनी लक्ष वेधले आहे.

_MPC_DIR_MPU_II

जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात पुणे, पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला. या पाश्वभूमीवर शासनाच्या आरोग्य विभागाने वरील निर्णय घेतला. त्याला उद्योगक्षेत्राचा विरोध नाही, असे बेलसरे यांनी स्पष्ट केले आहे.

बेलसरे पुढे म्हणतात, आजच्या घडीला 20 टक्के कोटा उद्योगांना सांगितला होता, तो सुद्धा उद्योगांना मिळत नाही. उद्या रुग्णांची संख्या वाढली तर उर्वरित 20 टक्के ऑक्सिजनसुद्धा कमी पडेल सध्या 20 टक्के ऑक्सिजनसुद्धा उद्योगांना उपलब्ध होत नाही रुग्णसंख्या आणखी वाढल्यास ऑक्सिजन पुरवठ्यासाठी शासनाचे काय नियोजन असणार आहे, असा प्रश्न बेलसरे यांनी केला आहे.

त्यामुळे सध्या ऑक्सिजनचा सिलेंडरवर अवलंबून असणारे उद्योग बंद करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे लाॅकडाऊननंतर अजून उद्योग क्षेत्र सावरले नाही तोच ऑक्सिजनचा सिलेंडरवरचा वाढता खर्च व अपुरा पुरवठा यामुळे उद्योग क्षेत्र अडचणीत आले आहे .यामुळे कामगारांवर पुन्हा बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असून शासनालाही जीएसटीच्या माध्यमातून मिळणारे उत्त्पन्न कमी होणार आहे, असे बेलसरे यांनी पत्रात म्हटले आहे.

शासनाने पर्यायी व्यवस्था न करता उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा 80 टक्के वरुन 20 टक्के पर्यंत कमी केला कोरोना रुग्णांना प्राधान्याने ऑक्सिजनचा पुरवठा व्हायला हवा परंतु, याचा अर्थ उद्योगांचा ऑक्सिजन काढून घेणे हा पर्याय होत नाही, उद्योग क्षेत्राला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुण्यात प्रतिदिन 100 टन पेक्षा जास्त प्रतिदिन ऑक्सिजनचे उत्पादन व पुरवठा करणारी यंत्रणा युद्ध पातळीवर उभी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकल्पासाठी सव्वाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, जो शासनाला अवघड नाही, परंतु त्यामधून रुग्णालय व औद्योगिक अशी दोघांची गरज भागवली जाईल तातडीने निर्णय घेतल्यास साधारणपणे एक महिन्यात सदर प्रकल्प उभा राहू शकतो व उद्योजक आणि कामगारांची होणारी संभाव्य उपासमार टाळू शकतो ती सदर प्रकल्प युद्ध पातळीवर मंजूर करून चालू करावा, अशी विनंती बेलसरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.