Pimpri News: ‘डांगे चौकातील ग्रेडसेपरटर मे अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करा’

आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना; शहरातील विकासकामांची पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी आज (बुधवारी) शहरातील विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी बीआरटीएस विभागाकडील चालू असलेल्या पुलांच्या कामांची पाहणी केली. डांगे चौकातील ग्रेडसेपरटरचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करुन वाहतुकीस खुला करण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता सतिश इंगळे, प्रमोद ओंभासे, उपअभियंता विजय भोजने, दीपक पाटील, रवींद्र सुर्यवंशी, संजय साळी, बापू गायकवाड, संजय काशीद, अभिजीत दाडे, बाळासाहेब शेठे आदी उपस्थित होते.

आयुक्तांनी सकाळी सात वाजता निगडीतील भक्ती-शक्ती पुलाच्या कामाची पाहणी करुन दौ-याला सुरुवात केली.

रावेत रेल्वे पूल, मुकाई चौक टर्मिनल, नियोजित ताथवडे पूल, आकुर्डी स्टेशन परिसरीतील अर्बन स्ट्रीट रस्ते, डांगे चौक ग्रेड सेपरेटर, वाकड हिंजवडी नियोजित पूल, मेट्रो स्टेशन, साई चौक जगताप डेअरी ग्रेड सेपरेटर आणि नियोजित फ्री-वेची आयुक्त राजेश पाटील यांनी पाहणी केली. साडेअकरा वाजता दौ-याची सांगता झाली.

भक्ती-शक्ती पूल महिनाअखेरपर्यंत पूर्ण करुन वाहतुकीस खुला करावा. रावेत येथील पुलासाठीच्या उर्वरित जागेचे भूसंपादन करण्याला गती द्यावी. नगर रचना विभागामार्फत कार्यवाही पूर्ण करुन पुलाचे काम लवकरात-लवकर सुरु करावे. अर्बन स्ट्रीट रस्त्यांच्यामध्ये ग्रीन पॉकेटमध्ये वाढ करावी. जेणेकरुन पादचा-यांना चालताना शुद्ध हवा मिळेल.

आयुक्तांनी ताथवडेतील नियोजित पुलाच्या जागेची पाहणी केली. येथील नियोजित कामाचा आराखडा समजून घेतला. डांगे चौकातील ग्रेडसेपरटरचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करुन तो वाहतुकीस खुला करावा. भूमकर चौकामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका-यांसमवेत बैठक आयोजित करावी.

तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या महापालिका हद्दीतील स्टेशनच्या जागेची आयुक्तांनी पाहणी केली. सावित्रीबाई फुले उद्यान ते हिंजवडी फ्री वे पुलाचा आराखडा समजून घेतला. साई चौकातील ग्रेडसेपरटरची पाहणी करत मे अखेरपर्यंत ग्रेडसेपरटर सुरु करण्याचे निर्देश दिले.

नाशिक फाट्यावरील दुमजली उड्डाणपुलाची पाहणी करीत मेट्रो, बीआरटी आणि रेल्वे या तीन वाहतूक व्यवस्थेचा एकात्मिक वाहतूक आराखडा समजून घेतला. केएसबी चौकातील उड्डापूल, ग्रेडसेपरेटर, टेल्को रस्ता, मोशीतील नियोजित स्टेडियमची जागा, भोसरीतील पांजरपोळ ते लोहगाव हद्दीपर्यंतच्या 90 मीटर रस्त्याच्या चालु कामांची आयुक्तांनी पाहणी केली. भोसरी गावठणातील अर्बन स्ट्रीट अंतर्गतच्या कामांचीही पाहणी केली.

”प्रकल्प चांगले आहेत. वाहतूक सुरळित होण्यास याची मोठी मदत होईल. परंतु, यात ‘ग्रीन’ पॉकेटमध्ये वाढ करावी. शुद्ध हवा मिळेल. कामे प्रेक्षणीय होतील, याबाबत विचार करावा. या कामांची जाहिरात मोठ्या प्रमाणात करावी”, अशा सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी अधिका-यांना दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.