Pimpri News: शहरातील हरित क्षेत्रे व उद्यानांना पादचारी मार्ग आणि सायकल मार्गाद्वारे जोडणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन 2030 पर्यंतचा विचार करून हरित सेतू विकसित करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या माध्यमातून महापालिकेच्या सर्व उद्यानांना तसेच शहरात असणा-या हरित क्षेत्रांना पादचारी मार्ग (फुटपाथ) अथवा सायकल मार्गाने जोडले जाणार आहे. या बहुप्रतिक्षीत उपक्रमाचा आज (गुरुवार) पासून शुभारंभ करण्यात आला आहे. “Connected Green” या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आधारीत असलेल्या मूळ संकल्पनेतून हा उपक्रम स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणार आहे.

यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व आपल्या अमूल्य सूचना द्याव्यात, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, शहरातील नागरिकांना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध व्हावे तसेच पर्यावरणपूरक जीवनमान अधिक उंचावण्यासाठी हा उपक्रम पथदर्शी ठरणार आहे. या शहराला राहण्यासाठी अतिशय उत्तम शहर बनविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पर्यावरणपूरक साधनांचा प्रभावी वापर करून शहरभर विखरलेल्या हरित क्षेत्रांना एकमेकांना जोडल्यास शहराची पर्यावरणीय गुणवत्ता वाढून त्याचा लाभ शहरवासियांना होईल. शहर विकासात या उपक्रमाचे अनन्यसाधारण महत्व असणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला आर्थिकदृष्ट्या परवडणारी घरे आणि राहण्यायोग्य असलेले देशातील सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी या उपक्रमाला अनेकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. शहरातील आणि त्याच्या आसपासच्या हिरव्यागार विस्तीर्ण जागांचा समावेश करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व बाबींचा व्यापक विचार करून हरित क्षेत्र जोडणी विकास आराखडा महापालिकेने शहर विकासाच्या दृष्टीने तयार केला आहे. देशातील अशा प्रकारच्या आराखड्याची अंमलबजावणी करणारे पिंपरी चिंचवड हे प्रथम शहर ठरणार आहे. शहरातील हरित पट्टे आणि विखुरलेल्या उद्यानांना जोडण्याचे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

समर्पित सायकल मार्ग आणि पादचारी मार्गांचा वापर करून नागरिकांना सुरक्षितपणे एका हरित क्षेत्र अथवा उद्यानापासून इतर उद्यानांपर्यंत जाता येईल. अशाप्रकारे या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. या माध्यमातून शहराची पर्यावरणीय गुणवत्ता आणि चैतन्य वाढीस मदत होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सद्यस्थितीत 184 विकसित केलेली उद्याने आहेत आणि शिवाय भविष्यातील विकासात्मक दृष्टीकोनातून काही ठिकाणी हरित क्षेत्रासाठी अतिरिक्त जागांचे आरक्षण ठेवले आहे, असेही त्यांनी सांगितले.

भविष्यातील लोकसंख्या वाढ आणि बदलत्या हवामानामुळे निर्माण होणा-या आव्हानांचा विचार केल्यास हरित सेतूचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. चारचाकी अथवा इतर वाहनांचा वापर करून होणा-या वाहतुकीऐवजी हरित सेतू हा एक उत्तम पर्याय मिळणार असून हरित क्षेत्रातील नागरिकांचा प्रवेश सुखकर व सहज होण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून नागरी सहभाग वाढून शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीवर चांगला परिणाम होणार आहे. सिंगापूरचे पार्क कनेक्टर नेटवर्क, सिडनीचे कनेक्टेड ग्रीड, न्यूयॉर्कमधील कनेक्टेड पार्क, इटलीमधील कनेक्टेड फॉरेस्ट इत्यादी जागतिक स्तरावरील हरित सेतूंची उदाहरणे आहेत.

शहरातील विकसित करण्यात आलेली आणि येणार असलेली हरित क्षेत्रे व उद्याने एकमेकांना पादचारी मार्ग आणि समर्पित सायकल ट्रॅक द्वारे जोडण्याची संकल्पना संपूर्ण शहरात राबवावी अशी शिफारस पीसीएमसी स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी केली आहे. सन 2030 पर्यंत पिंपरी-चिंचवड शहराला सर्व समावेशक आर्थिक उत्पन्नाचे स्रोत आणि भारतातील राहण्यायोग्य चांगल्या शहर बनविण्याच्या धोरणात्मक विकासासाठी शहरातील विविध स्तरातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे. संपूर्ण शहराचा विचार करून हरित सेतू विकास आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेने सुरू केले असून ही संकल्पना राबविणारे देशातील पहिले शहर असेल.

हरित सेतू उपक्रमाची उद्दिष्टे !

1) पादचारी मार्ग आणि समर्पित सायकल ट्रॅक याद्वारे हरित क्षेत्रातील प्रवेश योग्यता सुधारित करणे
2) हरित क्षेत्रामध्ये नागरिकांचा वावर सुरक्षित असण्याची खात्री करणे
3) शहराचे पर्यावरण संतुलन आणि राहणीमान गुणवत्ता वाढविणे

नागरी सहभाग !
सर्वांच्या सहकार्याने हरित सेतू विकास आराखडा तयार करण्याचा महापालिकेचा मानस आहे. यासाठी तज्ञांची विविध नाविण्यपूर्ण बाबींबद्दल चर्चात्मक कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. या माध्यमातून शहरातील नगररचनाकार, संकल्पक, स्वयंसेवी संस्था, या क्षेत्रातील विविध तज्ज्ञ आणि महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे अधिकारी कर्मचारी, शैक्षणिक तज्ञ यांच्या सहभागातून हरित सेतू उपक्रमाची मुलभूत रचना करण्यात येईल.

उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी असणा-या संधी/अडचणी, धोरणात्मक शिफारसी तसेच आर्थिक नियोजन आणि नागरी सहभागासाठी तज्ञांचे मार्गदर्शन यातून सर्वसमावेशक हरित विकास आराखडा विकसित करणे हा या कार्यशाळेचा उद्देश असेल. या कार्यशाळेमध्ये जनजागृती मोहीम, प्रभाग पातळीवर नागरिकांशी चर्चात्मक संवाद आणि आराखडा अंमलबजावणीसाठी आवश्यक मापदंडाची पायाभरणी केली जाईल. या प्रकल्पासाठी नागरिकांच्या कल्पना तथा सूचना देखील मागविण्यासाठी मोहिम महापालिकेच्या वतीने सुरू केली जाईल. या कल्पनांचे तज्ज्ञांकडून मुल्यांकन करून योग्य बाबींचा अंतर्भाव या उपक्रमात केला जाईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.