Pimpri News: बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करा, आमदार अण्णा बनसोडे यांचे आंबेडकरी अनुयायांना आवाहन

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार सन्मानाने साजरी केली जावी. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केले जाईल, असा विश्वासही बनसोडे यांनी व्यक्त केला.

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, गेल्यावर्षी पूर्ण लॉकडाऊन होते. पण विषाणूने केवळ शिरकाव केला होता. आता मात्र कोरोनाने आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. दिवसागणिक रुग्णवाढ होऊ लागली आहे. जोपर्यंत आपण मनापासून शिस्त पाळत नाही, तोपर्यंत ही रुग्णवाढ कमी होणार नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन करावे लागत आहे.

कमीत कमी गर्दी आणि नियमांचे पालन करूनच जयंती साजरी करावी लागेल. साधारण परिस्थितीत आपण ज्या प्रथा-परंपरा पाळून जयंती साजरी करतो, त्या सर्व गोष्टी तितक्याच सन्मानपूर्व केल्या जातील. आपण सर्व डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे सन्मान करणारे आहोत, बाबासाहेब यांच्या शिस्तीचे भोक्ते आहोत, हे अशा कठीण परिस्थितीत दाखवून देणे अपेक्षित आणि आवश्यक आहे, असे बनसोडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.