Pimpri News : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरीतील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अनुयायांनी अभिवादन केले. बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच अनुयायी स्मारक परिसरात गर्दी केली होती.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बाबासाहेबांच्या पिंपरी येथील पुतळ्यास महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्मारक परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. अनुयायांनी मेणबत्ती लावून बाबासाहेबांना अभिवादन केले. सायंकाळी भीमगीतांचा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्याचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थिती लावत आहेत.

शहरात ठिकठिकाणी राजकीय पक्ष आणि संघटनांच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. काही ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर साध्या पद्धतीने महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

दरवर्षी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी दादरच्या शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरात राहून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन राज्य सरकारसह पालिकेकडून करण्यात आले होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वपक्षीय नेत्यांनी ट्वीट करत अभिवादन केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.