Pimpri News : एचए मैदानात टाकला जातोय वैद्यकीय कचरा; नागरिकांच्या जीवाशी खेळ

एमपीसी न्यूज – नेहरूनगर येथील एच. ए. मैदानावर परिसरातील काही खाजगी दवाखान्यांमधून निघणारा वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.

मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्याबाबत शासनाने दिशानिर्देश घालून दिले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी असलेल्या खाजगी दवाखान्यांमधील वैद्यकीय कचरा महापालिकेच्या माध्यमातून जमा करण्यात येतो.

मात्र, ज्या खाजगी दवाखान्यांची पालिकेकडे नोंद नाही, अशा दवाखान्यातून निघणारा कचरा मात्र पालिकेकडून जमा केला जात नाही.

दवाखान्यातून इंजेक्शन, सुया, सलाईन, ड्रेसिंगचे साहित्य, रिकाम्या औषधांच्या बाटल्या, त्याचे बॉक्स असा कचरा निघतो. त्याचे विभाजन करून तो कचरा आरोग्य विभागाच्या वाहनात दिला जातो. हा कचरा उघड्यावर टाकल्यास अनेक आजार पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

तसेच वापरलेल्या इंजेक्शनच्या सुया टोचल्यास त्यातूनही धोका आहे. मुदतबाह्य औषधे जनावरांच्या पोटात गेल्यास त्यातून गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका आहे.

नेहरूनगर येथून पिंपरीकडे जाणा-या मार्गावर एच ए मैदानाच्या कोप-यावर मोठ्या प्रमाणात दवाखान्यातून निघणारा कचरा टाकण्यात आला आहे. नोंदणी न केलेल्या दवाखान्यांकडून हा प्रकार केला जात असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. परिसरातील दवाखान्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, “ज्या ठिकाणी मेडिकल वेस्ट टाकले जात आहे, त्या परिसरातील डॉक्टरांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.