Pimpri News: ‘एचए’ कंपनीला कोरोना लस निर्मितीची परवानगी द्यावी : संदीप वाघेरे

लस निर्मितीसाठी पालिकेने कंपनीला 100 कोटी रुपयांची मदत करावी

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील हिंदूस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एच ए) कंपनीला कोरोनावरील लस निर्मितीची परवानगी द्यावी. त्यासाठी महापालिकेने एचएला 100 कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी. केंद्र व राज्य सरकारशी चर्चा करून शहारवासीयांना मोफत लस व रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

याबाबत नगरसेवक वाघेरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेष्ठ नेते शरद पवार यांना ई मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. तसेच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील हिंदूस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीला देशाच्या औषध निर्मितीच्या सुरुवातीच्या काळातील योगदानाबद्दल मोठा इतिहास आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना पुणे येथे आगाखान पॅलेसमध्ये असताना पेनीसिलीन वेळेत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी तत्काळ पेनीसेलिन निर्मितीचा कारखाना पिंपरी येथे सुरु करण्याचे आदेश दिले. त्यावेळी एचए कंपनी उभी राहिली.

याच धर्तीवर देशाला कोरोना महामारीच्या काळात लस व औेषधांची गरज असताना एचएला पुन्हा देशसेवेसाठी उभे करता येईल. त्यासाठी एचए कंपनीला लस निर्मिती करण्याची परवानगी केंद्र शासनाकडून घ्यावी. वेळप्रसंगी हाफकिन इन्स्टिट्यूट बरोबर भागिदारी (टायप) करावी. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेने एचए कंपनीकडून लस घेण्यासाठी एचए कंपनीला सुमारे 100 कोटी रुपये आर्थिक सहकार्य करावे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोफत लस व रेमडेसिविर अथवा कोरोना महामारीला लागणारे औषधेही मिळतील. तसेच एचए कंपनीच्या 450 कामगारांना आणि कंपनीलाही कंपनीच्या अडचणीच्या व वाईट काळात मदतीचा हात मिळेल.

पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका यांनी कंपनीला स्व:हिस्सा व केंद्र व राज्य सरकारच्या वतीने आर्थिक मदत ‘एचए’ला करावी. ही मदत झाल्यास एचए कंपनीत रेमडेसिविर सारखी कोरोनावरील औषधे तयार होतील. तसेच एचए कंपनीत सध्या पावडर स्वरुपात औषध बनविणार्‍या मशनरींबरोबरच लिक्विड स्वरुपात लस, औषधे बनविणार्‍या अद्ययावात मशिन्स युध्दपातळीवर लावून लस बनविण्याची परवानगी घेतल्यास एचए कंपनीचे खर्‍या अर्थाने पुनर्जीवन होईल.

याबरोबरच पिंपरी-चिंचवड व पुणे शहराबरोबरच राज्य व देशात लस व कोरोनाचा औषध पुरवठा मोफत करता येईल. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी एचए कंपनीच्या सरव्यवस्थापकांशी तसेच राज्य व केंद्र सरकारशी चर्चा करावी. जलदगतीने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी नगरसेवक वाघेरे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.