Pimpri News: झोपडपट्टीतील नागरिक सुविधांअभावी हैराण ; महापालिकेची रंगरंगोटीच्या दिखाव्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी – बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील झोपडपट्टीवासीय विविध समस्यांनी हैराण असून त्या सोडविणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध ठिकाणी सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून रंगरंगोटीची कामे करण्यात येत आहेत. झोपडपट्टीच्या हजारो समस्या सोडविण्याऐवजी रंगरंगोटीवर सत्ताधारी खर्च करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

झोपडपट्टीच्या समस्या तशाच ठेऊन शहरात रंगरंगोटी करून महापालिका सत्ताधारी आणि अधिकारी झोपड्पट्टीवासियांची थट्टा करत असल्याचा आरोप, कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केला.

महाराष्ट्र मजूर पक्षाचे अध्यक्ष भाऊसाहेब आडगळे, बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, भिमशाही युवा संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर उबाळे, बळीराम काकडे, सदाशिव तळेकर, अनिता सावळे, गौरी शेलार आदीसह विविध संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली.

बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले की,पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील झोपडपट्टीवासीय विविध समस्यांनी हैराण झाले आहेत. झोपडपट्टीमध्ये दूषित पाणी, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, तुंबलेले नाले, कचरा आदी समस्या मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या आहेत. त्या सोडविण्याकडे महापालिका सत्ताधारी आणि अधिकारी उदासीन दिसत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधी रुपयांच्या कामाला विनाकारण परवानगी दिली जात आहे. पिंपरीतील रंगरंगोटी केलेल्या टिपू सुलताननगर येथे पाहणी केली. या वेळी येथील नागरीकांनी समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. या परिसरात सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. दरवाजे निखळून पडले असल्याने महिलांची व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तुंबलेले नाले काढण्याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे. ड्रेनेज तुंबलेले असून त्यामधून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे साथीचे आजार या परिसरात वाढण्याची भीती आहे.

कचऱ्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. आरोग्य विभागाचे वाहन कचरा उचलण्यासाठी येथे येत नाही. या एका झोपडपट्टी सह पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 70 पेक्षा अधिक झोपडपट्टी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना कुठल्याही सुविधा मिळत नाही. त्यांना सुविधा मिळाव्या म्हणून, संघटनेच्या मार्फत सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. घरे देऊन शहर झोपडपट्टी मुक्त करण्याची वलग्ना सत्ताधाऱ्यांनी केल्या होत्या. पाचशे स्क्वेअर फुटच्या घरात पुनर्वसन व्हावे, अशी मागणी अनेक वेळा आम्ही लावून धरली आहे. परंतु ह्या मागण्यांचा अद्याप पर्यंत सकारात्मक विचार करण्यात आला नाही.

अशा अनेक समस्यांनी झोपडट्टीमधील नागरिक त्रस्त आहेत. त्या सोडविण्याचे तर दुरच उलट महापालिका नको त्या योजनांवर खर्च करत आहे. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिका रंगरंगोटीच्या नावाखाली झोपडपट्टीमधील नागरिकांची थट्टा करत आहे. सध्या स्वच्छ भारत अभियाणांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून रंगरंगोटी करण्याचा दिखावा सुरु आहे. वरून शहर स्वच्छ दिसेल मात्र झोपड्पट्टीमधील समस्याकडे दुर्लक्ष होणार हे चित्र आहे. आयुक्त राजेश पाटील आणि झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त आण्णा बोदडे देखील अशी कामे मंजूर करून चुकीच्या कामांना खतपाणी घालत असल्याचा आरोप कांबळे यांनी केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.