Pimpri News: पालिकेच्या प्रभाग अध्यक्षपदी ‘यांची’ होणार बिनविरोध निवड, राष्ट्रवादी निवडणुकीत उतरलीच नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध होणार आहे. सत्ताधारी भाजपच्या हाती आठही प्रभाग जाणार आहेत. प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत आज (सोमवारी) केवळ भाजप नगरसेवकांनी अर्ज भरले आहेत. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरले नाहीत. त्यामुळे बिनविरोध निवडीवर 9 ऑक्टोबर रोजी शिक्कामोर्तब होणार आहे.

भाजपकडून ‘अ’ प्रभाग अध्यक्षपदासाठी शर्मिला बाबर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ‘ब’ प्रभाग सुरेश भोईर, ‘क’ प्रभाग राजेंद्र लांडगे, ‘ड’ प्रभाग सागर आंगोळकर, ‘ई’ प्रभाग विकास डोळस, ‘ग’ प्रभाग अध्यक्षपदासाठी बाबा त्रिभुवन यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

‘ह’ प्रभाग हर्षल ढोरे आणि ‘फ’ अध्यक्षपदासाठी कुंदन गायकवाड यांचा अर्ज भरला आहे. अर्ज भरण्यासाठी आज दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ होती. या मुदतीत केवळ भाजपचे अर्ज आले. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरले नाहीत. त्यामुळे बिनविरोध निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. विद्यमान अध्यक्षांचा वर्षाचा कार्यकाळ एप्रिल महिन्यातच संपला होता. प्रभाग समित्या बरखास्त होत नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर त्यांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ मिळाली होती. राज्य सरकारने निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे.

9 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ही सभा होणार आहे. या सभेत बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब होईल.

पालिकेतील मधुकर पवळे सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता निवडणूक होणार आहे. अपंग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, ”आठही प्रभागात भाजपचे वर्चस्व आहे. आमच्याकडे संख्याबळ नाही. शहरात कोरोनाची परिस्थिती आहे. त्यामुळे प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले नाहीत”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.