Pimpri news: शहरात आरोग्य आणीबाणी ! ‘व्हेटिंलेटर’बेड शिल्लक नाही, लस संपली, रेमडेसिवीरचा तुटवडा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आरोग्य आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या गंभीर, अतिगंभीर रुग्णांना आवश्यक असलेल्या ‘व्हेटिंलेटर’चे एकही बेड शहरात उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले आहे. तर, कोरोना प्रतिबंधक लस संपल्याने शहरातील लसीकरण आज ठप्प झाले आहे. तिसरीकडे गंभीर रुग्णांना उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे शहरातील परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे.

मागील दोन महिन्यांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णवाढीचा दररोज नवीन उच्चांक होत आहे. रुग्णालयात दाखल होणा-यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात गंभीर, अतिगंभीर रुग्णांचीही संख्या अधिक आहे. परिणामी, गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेटिंलेटर बेडची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे.

महापालिकेच्या वायसीएम, भोसरी, जिजामाता, अॅटो क्‍लस्टर या रुग्णालयांमध्ये गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर आणि बालनगरी, घरकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणेविरहित रुग्णांवर उपचार केले जातात. महापालिकेची रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळेच नागरिकांना बेड मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. अनेकांना बेड मिळत नाही. त्यामुळे शहरातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे.

शहरात ‘व्हेटिंलेटर’च्या बेडची मोठी कमतरता आहे. अतिगंभीर रुग्ण असल्यास त्याला ‘व्हेटिंलेटर’चे बेड मिळणे मुश्किल होत आहे. शहरातील महापालिका आणि खासगी दवाखान्यात दुपारपर्यंत एकही व्हेटिंलेटर’चे बेड उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांला बेड मिळणे अशक्य झाले आहे.

याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”शहरात व्हेटिंलेटर बेडची मोठी कमतरता आहे. महापालिका आणि शहरातील खासगी रुग्णालयात दुपारपर्यंत व्हेटिंलेटरची एकही बेड उपलब्ध नाही. व्हेटिंलेटर बेडची गरज पडल्यास ते देणे अवघड झाले आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.