Pimpri news: हृदयद्रावक! जुळ्या गोंडस बाळांना जन्म देणाऱ्या कोरोनाबाधित आईचा 24 तासांत मृत्यू

कोरोनाने जुळ्या चिमुकलींच्या डोक्यावरील मायेचं छत्र हिरावून घेतलं

एमपीसी न्यूज – जुळ्या गोंडस बाळांना जन्म देणाऱ्या कोरोनाबाधित आईचा अवघ्या 24 तासांत मृत्यू झाला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आज (मंगळवारी) घडली.

मृत महिलेचे वय अवघे 35 वर्षे होते. कोरोनाने जुळ्या चिमुकलींच्या डोक्यावरील मायेचं छत्र हिरावून घेतले आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन गरोदर महिलांसाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. गरोदर महिलांनी लक्षणे दिसताच कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.

पिंपरीगावातील 35 वर्षाची गरोदर महिला वायसीएम रुग्णालयात दाखल झाली होती. त्यांचे शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी असल्याने कोरोनाची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली होती.

दरम्यान, त्यांचे सीझर केले. त्यांनी सोमवारी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. सीझरनंतर त्यांच्या प्रगतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यांना आयसीयु व्हेंटिलेटरवर ठेवले होते.

उपचारादरम्यान आज सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांना दोन मुली झाल्या असून त्या ऑक्सिजनवर आहेत. त्यांची रॅपिड निगेटिव्ह असून आरटीपीसीआरचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. कोरोनाने जुळ्या चिमुकलींच्या डोक्यावरील मायेचं छत्र हिरावले आहे. मायेची ऊब घेण्याचं नशीब देखील या बाळांच्या नशिबी आले नाही. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

वायसीएम रुग्णालयातील डॉ. विनायक पाटील म्हणाले, ” या महिलेचा एक्सरे खराब होता. त्यांना निमोनिया होता. त्यांनी काल दोन मुलींना जन्म दिला. त्यांना ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन दिले पण, त्यांचा आज मृत्यू झाला. दोन्ही बाळं ऑक्सिजनवर होती. आता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांची रॅपिड निगेटिव्ह असून आरटीपीसीआरचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत.

मागच्या वर्षीचा स्ट्रेन बघितला तर गरोदर महिलांना कोरोना होत होता. पण, रुग्ण गंभीर होत नव्हते. या वर्षी पहिल्या गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात सध्या वीस कोरोना बाधित गरोदर महिला उपचार घेतात आहेत. त्यातील 16 नॉन ऑक्सिजनवर आहेत.

पाच महिला ऑक्सिजनवर असून त्यातील तीन गरोदर महिला आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. गरोदर महिलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची गरज आहे. लक्षणे दिसताच गरोदर महिलांनी कोरोना चाचणी केली पाहिजे. घरी उपचार घेणे चुकीचे आहे”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.