Pimpri news: ‘अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; केंद्र सरकारने राज्याला आर्थिक मदत करावी’

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची पंतप्रधान, अर्थमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, उडीद, भात ही पिके वाया गेली आहेत. हातात तोंडला आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. राज्य सरकार आपल्या परीने मदत करतच आहे. पण संकट खूप मोठे आहे. आर्थिक परिस्थिती पाहता राज्य सरकारला पेलवणारे नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला मोठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र पाठविले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात गेले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आजमितीलाही दिवसाला दहा हजारहून अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्याला आर्थिक चणचण भासत आहे. जून महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला होता.

आता झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातील पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. माझ्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पुणे आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे.

दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक पाण्यात गेले आहे. अशा या कठीण प्रसंगात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारला मोठ्या मदतीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता केंद्राने राज्याला मोठी आर्थिक मदत करावी, अशी विनंती खासदार बारणे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.