Pimpri News : मुसळधार पावसाने शहराला झोडपले; पालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

एमपीसी न्यूज – मावळसह पिंपरी-चिंचवड शहरात धुवांधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने शहराला झोडपले आहे. नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे पहिल्यांदाच पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पवना धरणातून विसर्ग केला नसतानाही नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना पुरामुळे धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे. क्षेत्रीय स्तरावर गस्ती पथक कार्यरत असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली. त्यामुळे पाण्याचा निचरा झाला. पाणी साचून राहिले नाही. श्री मोरया गोसावी मंदीरात काल पाणी शिरले होते. मंदिराचा काही भाग पाण्यात बुडाला होता. मात्र्, तिथे आज पाणी कमी झाले आहे. मंदिरात पाणी साचले नव्हते, असे देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी सांगितले.

”दुपारपर्यंत पाऊस जास्त होता. रावेत, किवळे, पिंपळेनिलखसह नदीकाठच्या भागाची पाहणी केली. नदीला पाणी वाढत असून हे सर्व पावसाचे पाणी आहे. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला नाही. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यास नदीकाठच्या नागरिकांच्या स्थलांतरणाची महापालिकेने सोय केली आहे.

पिंपरी, फुलेनगरमधील नागरिकांनी स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. परंतु, नाल्याचे पाणी वाढले नसल्याने त्यांना स्थलांतरित केले नाही. गरज पडली तर त्यांना रात्री सुरक्षितस्थळी हलवू शकतो. अग्निशामकदलही सज्ज असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ”दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे पाणी कोठेही साचून राहिले नाही. नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची आत्तापर्यंत वेळ आली नाही. परंतु, पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास आणि नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आल्यास महापालिकेने तयारी केली आहे.

त्यासाठी शाळांची साफसफाई करुन ठेवली आहे. वीज गेल्यास जनरेटरचीही व्यवस्था केली आहे. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यास नदीकाठच्या नागरिकांना उद्या, परवा स्थलांतरित करण्याची वेळ येवू शकेल. महापालिकेचा पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. बोटी, जॅकेट सज्ज ठेवल्या आहेत. आम्ही लक्ष ठेवून आहोत”.

पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी म्हणाले, ”पवना धरण परिसरात दिवसभर पाऊस पडत आहे. सकाळपासून आत्तापर्यंत 39 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दोन टक्क्यांनी पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 68 टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातून पाण्याचा सध्यातरी विसर्ग केला जाणार नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.