Pimpri news: स्मार्ट सिटी सायबर हल्लाप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज –  शेकडो कोटी खर्चून तयार केलेल्या स्मार्ट सिटी सर्व्हरवर सायबर हल्ला होऊन डेटा चोरीसारखा प्रकार होणे, ही बाब पिंपरी-चिंचवडकरांची सुरक्षितता धोक्यात टाकणारी आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे काम व गलथान कारभार सुरू आहे. सत्य समोर येण्यासाठी संबधित कंत्राटदार, सहकंत्राटदार कंपन्यांचे कनेक्शन तपासणे आवश्यक आहे. त्या करिता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची तक्रार टेक महिंद्रा कंपनीच्या अधिका-यांनी पोलिसांकडे दिली आहे. या तक्रारीत सायबर हल्ल्याव्दारे अज्ञात व्यक्तीने सर्व्हरमधील डाटा इन्क्रिप्ट करून बिटकॉईनद्वारे पैशाची मागणी केल्याचे म्हटले आहे.

या सगळ्यात पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावाही संबधित कंपनीने केला आहे. स्मार्ट सिटी कंपनी स्थापन केल्यापासून शहर स्मार्ट करण्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची कामे काढण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या नावावर सुरू असलेल्या या प्रकल्पात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीतून मोठा खर्च केला जात आहे.

शहर स्मार्ट करण्यासाठी टेक महिंद्रा कंपनीला स्मार्ट सिटी कंपनीमार्फत दिलेले काम सुमारे चारशे कोटींहून अधिक रकमेचे आहे. या कामात घडलेला हा प्रकार गंभीर असून स्मार्ट सिटीच्या कारभाराबरोबर पिंपरी-चिंचवडच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केंद्र सरकारच्या मोठा गाजावाजा करत सत्ताधारी भाजपने शहरात राबविलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पावर करोडो रुपये खर्च केले गेले. प्रत्यक्षात चार वर्षात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी झाले का, हा संशोधनाचा विषय आहे.

सायबर हल्ल्याचे हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटत आहे. हे काम करत असलेल्या ठेकेदार कंपनीमार्फत पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. तोपर्यंत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीचे व्यवस्थापन काय करत होते ? कंपनीच्या देखरेख नियंत्रणात हे काम होत नाही का ? स्मार्ट सिटी कंपनीने नेमलेले सल्लागारी संस्था काय करतात होत्या ?, असा सवाल वाघेरे यांनी उपस्थित केला आहे.

कंत्राटदार कंपनीने पाच कोटीच्या नुकसानाचा दावा केला आहे. तर भाजप पदाधिका-यांनी कोणतेही नुकसान न झाल्याचा दावा केल्याने आणखी संशय बळावला आहे. या प्रकारावर स्मार्ट सिटीच्या अधिका-यांनी भूमिका मांडणे गरजेचे असताना भाजप पदाधिकारी का बाजू मांडत आहेत ?, असेही वाघेरे यांनी म्हटले आहे.

टेक महिंद्रा कंपनीने या कामासाठी आणखी काही कंत्राटदार कंपन्यांना सोबत घेतल्याची माहिती समोर येत आहे. या भागिदार कंपन्या कोणाच्या आहेत, हे देखील तपासण्याची गरज आहे. हे कनेक्शन समोर आल्यामुळे या कामातील गैरप्रकार आणि स्मार्ट सिटीचा गलथान कारभार उघड होऊ शकणार आहे.

दरम्यान, महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या भाजपकडून या प्रकारावर सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने या कामातील कंत्राटदार, सह कंत्राटदार कंपन्यांचे कनेक्शन तपासणे आवश्यक असून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, असे संजोग वाघेरे-पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.