Pimpri News: विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयासमोर ‘पे अँड पार्किंग’च्या ठरावाची होळी

'पे अँड पार्किंग' विरोधात सभागृहात आवाज उठवा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये शिस्तीच्या नावाखाली जनतेचा विरोध जुगारून केवळ महसूल गोळा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ” पे अँड पार्किंग ” धोरण लागू केले. याविरोधात अपना वतन संघटनेने सर्वसामान्य जनतेच्या भावना राजकीय पक्षांच्या जबाबदार लोकप्रतिनिधींसमोर मांडण्याचा व पे अँड पार्किंग धोरण चुकीचे आहे हे सांगण्याकरता त्यांच्या स्थानिक कार्यालयावर आंदोलन सुरु केले आहे.

याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या वतीने आज ( शनिवारी) विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यालयावर ‘पे अँड पार्किंग’च्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात करण्यात आला. तसेच या प्रश्नावर सभागृहात आवाज उठविण्याची मागणी केली.

यावेळी आंदोलकांनी पे अँड पार्कींगचा प्रस्ताव जाळला. ‘ पे अँड पार्किंग रद्द करा, पे अँड पार्किंगच्या माध्यमातून होणारी पिळवणूक थांबवा’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

अपना वतन संघटनेचे शहर कार्यध्यक्ष हमीद शेख, महिला अध्यक्ष राजश्री शिरवळकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार, संघटक निर्मला डांगे, नॅशनल ब्लॅक पँथरच्या संगीत शहा, तौफिक पठाण, छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, सालार शेख, इमाम नदाफ, सुधीर वाळके, संकल्प फाउंडेशनचे गणेश जगताप, केशव बुडगल, लक्ष्मण पांचाळ यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख म्हणाले, शहराच्या विकास आराखड्यामध्ये वाहनतळाची आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्याचा वापर करावा. रस्त्याच्या कामासाठी अनेक नागरिकांना बेघर करून त्या जागेवर पे अँड पार्किंग करणे योग्य नाही. रेस्टॉरंट, हॉस्पिटल , व्यावसायिक इमारती यांना पार्किंग नसताना बांधकाम परवानगी दिली आहे. परंतु, त्याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य नागरिकांकडून वसूल केला जात आहे. दैनंदिन कामासाठी बाहेर पडणारे इंडस्ट्रियल कामगार, नोकरदार महिला, सेल्समन, पोलीस कर्मचारी, व्यापारी, अपंग नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला अशा लोकांना दिवसातून अनेकवेळा पार्किंगचे पैसे भरावे लागत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी पे अँड पार्किंग विरोधात सभागृहात आवाज उठवावा व त्याचा विरोध करावा.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.