Pimpri News : मला माणूस ओळखता येतो – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

मानिनी महिला मंडळाच्या वतीने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा नागरी सत्कार

एमपीसी न्यूज – खाकी वर्दी हा पोलिसांचा धर्म आणि कर्तव्य आहे. मी कर्तव्याचे पालन करणारा असून मागील वर्षांत 4 हजार 700 नागरिकांना मी भेटलो आहे. त्यामुळे मला माणूस ओळखता येतो. लोकशाही आणि लोककल्याणकारी राज्यामध्ये पोलीस प्रशासन दबाव टाकणारी किंवा लगान वसूल करणारी यंत्रणा नाही, असे मत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केले.

सर्व पक्ष आणि मानिनी महिला मंडळाच्या वतीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात सोमवारी (दि. 6) हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार विलास लांडे, कामगार नेते बाबा कांबळे, नगरसेवक सचिन चिखले, पुणे मनपा नगरसेवक प्रशांत म्हस्के, कार्यक्रमाच्या संयोजिका व मानिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा डंबाळे, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्षनेते राहुल डंबाळे, उद्योजक श्रीकांत बडवे आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, “मी सत्याच्या शोधात आहे. ते सत्य शोधता – शोधता सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, सामाजिक संस्था, संघटना, बातमीदार आणि समाजातील जबाबदार नागरिकांचे मी जाळे जोडले. त्यांच्या माध्यमांतून मला माहिती मिळत गेली आणि माझ्या कल्पनेप्रमाणे काम करीत गेलो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चांगले काम करता आले. माझा जो नागरी सत्कार झाला तो मी एक प्रतिनिधी आहे हा तुम्हा सर्वांचा सत्कार आहे.

कृष्णप्रकाश पुढे म्हणाले, समाजकंटकांचे निर्दालण करणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. पोलिस आणि नागरीक एकत्र येऊन आणखी चांगले काम करु शकतात. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र पुण्यापेक्षा मोठे आहे. परंतु, कर्मचारी संख्या कमी आहे. सर्व सामान्य लोकांची कायदा पालन करण्याची इच्छा असते. मुलांनी चांगले शिक्षण घेऊन चांगला नागरीक बनणे हे उद्दीष्ठ ठेवावे. खाकी वर्दी हा पोलिसांचा धर्म आणि कर्तव्य आहे. मी कर्तव्याचे पालन करणारा असून मागील वर्षात 4 हजार 700 नागरीकांना मी भेटलो. त्यामुळे मला माणूस ओळखता येतो.

गौतम बुध्दांनी सांगितल्याप्रमाणे ‘मै कोई बात करता हू उसपे विश्वास मत करो, मगर ये बात आपके बुध्दी, मन को सही लगे तो ही विश्वास करो’ याप्रमाणे मी वागतो. मला सेलिब्रेटी व्हायचे नाही. चांगले काम करुन प्रसिध्दी मिळतेच की, तसेच नेता देखील व्हायचे नाही. नेता हा प्रत्येक क्षेत्रात असतो. मी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे नेतृत्व करतो आहे असेही कृष्ण प्रकाश म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा महापौर ढोरे म्हणाल्या, “कृष्ण प्रकाश यांनी मागील वर्षभरात ज्या धडाडीने काम केले. त्यामुळे शहरातील महिला भगिनींना दिलासा मिळाला आहे. शहरातील जुगार अड्डे बंद झाल्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. कृष्ण प्रकाश यांचा जन्म दहीहंडीच्या दिवशीचा. त्यामुळे त्यांचे नाव कृष्ण ठेवले आहे. अगदी नावाप्रमाणे त्यांचे काम आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा.”

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “गुन्हेगारांना कधीकधी पोलीस खात्यातून पाठबळ मिळते. याला कृष्णप्रकाश यांनी पायबंद घातला. यांनी केलेले काम पाहून यानंतरच्या येणा-या अधिका-यांना आणखी चांगले काम करावे लागेल.”

कार्यक्रमाच्या संयोजनात शिवशंकर उबाळे, मेघा आठवले, अजय लोंढे, ज्ञानेश्वर बोराटे, अमोल डंबाळे यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक सुवर्णा डंबाळे, सूत्रसंचालन नयन जयप्रकाश यांनी केले. बाबा कांबळे यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.