Pimpri News: आवश्यकता भासल्यास कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालये अधिग्रहित करणार – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये 24 तास लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालये देखील अधिग्रहित करण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा आज (बुधवारी) घेण्यात आला.

महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या डॉ. वैशाली घोडेकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आदी उपस्थित होते.

आयुक्त पाटील म्हणाले, मास्क न वापरणा-या तसेच कोरोना नियमांचे पालन न करणा-या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे. शहरातील कोरोना रुग्णवाढ होत असलेले भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहेत. शहरातील गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा महापालिकेकडे उपलब्ध आहे.

आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालये देखील अधिग्रहित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कोरोना कामकाजासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांसाठी कॉल सेंटर देखील कार्यान्वित करण्यात आले आहे, असे आयुक्त पाटील यांनी सांगितले.

महापालिकेची सर्व यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज ठेवावी. शहरातील कोरोना बाधितांना वैद्यकीय उपचार घेताना कोणतीही अडचण उद्भवणार नाही याची पूर्णतः खबरदारी प्रशासनाने घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड-19 लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा यंत्रणा नेमावी.

कोरोना विषयक कामकाज करताना कोरोना बाधित होऊन मरण पावलेल्या महापालिका कर्माचा-यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य तसेच अनुकंपा तत्वावर तातडीने नियुक्ती द्यावी, महागड्या रुग्णालयांचे दर सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी महापालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये अद्यावत सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महापौर ढोरे यांनी प्रशासानाला दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.