गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Pimpri News : संविधान सर्वांच्या रोजच्या जगण्याचा भाग झाले तर…

एमपीसी न्यूज – भारतीय संविधान (Pimpri News) हे फक्त न्यायालयापुरतेच सीमित न ठेवता या संविधानाची जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असून हे संविधान सर्वांच्या रोजच्या जगण्याचा भाग झाले, तर नक्कीच भविष्यात सकारात्मक बदल घडेल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांनी केले.

संविधान दिवसाचे औचित्य साधून संविधानाची शहरातील नागरिकांना ओळख व्हावी, यासाठी महापालिकेच्या वतीने दि.26 आणि 27 नोव्हेंबर रोजी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपआयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसेवक बाबा त्रिभुवन, मारुती भापकर, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, रयत विचार मंचाचे धम्मराज साळवे, संतोष शिंदे, संतोष जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते मनोज तोरडमल, अण्णासाहेब कुडळे तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा (Pimpri News)  महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ई-बाईक बनवली. त्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. महापालिकेच्या थेरगाव येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित पोवाडा सादर केला. या पोवाड्याचे उपस्थितांनी कौतुक देखील केले. महापालिका आयोजित आणि बानाई व रयत विद्यार्थी विचार मंच यांच्या सहकार्याने शहरातील सर्व प्रभागात संविधान संवादक अभियान उपक्रमाद्वारे संविधान रथ तसेच पथनाट्याच्या माध्यमातून भारतीय संविधानाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियानाची औपचारिक सुरुवात यावेळी करण्यात आली.

दरम्यान, सकाळी 10.30 वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर, पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

सप्तखंजिरीवादक पवन दवंडे यांच्या लोकप्रबोधनात्मक किर्तनाच्या (Pimpri News) कार्यक्रमाने या प्रबोधनात्मक पर्वाची सुरुवात झाली. दुपारी 2 वाजता कविसंमेलन पार पडले. ‘….आणि तरीही आम्ही बोलू नये’ यावर आधारित कविसंमेलनामध्ये अनेक दिग्गज कवींनी सहभाग घेतला होता. दुपारी 4.30 वाजता ‘माध्यमातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरील आव्हाने’ या विषयावर महाचर्चा आयोजित केली होती. यामध्ये चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते महेश कोठारे, अभिनेते संदीप पाठक आणि अभिनेते राजकुमार तांगडे सहभागी झाले होते. चर्चासत्राचे सूत्रसंचालन वृत्तवाहिनी निवेदक प्रसन्न जोशी यांनी केले. त्यानंतर अश्वघोष आर्ट अँन्ड कल्चरल फाऊंडेशन संचलित कबीर नाईकनवरे यांचा गीत, संगीत आणि निवेदनातून भारतीय संविधानाची जनजागृती करणारा प्रबोधनात्मक गीतांच्या महाजलसेचा ‘सलाम संविधान’ हा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच सायंकाळी पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहामध्ये धीरज वानखेडे, मंजुषा शिंदे आणि संकल्प गोळे यांचा गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला.

Pune News : लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण धावले संविधानासाठी..!!

27 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता महिला बचत गट मेळावा आणि दिव्यांगासाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे. समाज विकास विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 11 वाजता ‘भारतीय संविधानाची ओळख’ या विषयावर संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांचे व्याख्यान होणार असून दुपारी 12.30 वाजता भारतीय संविधानावर आधारित ‘ही गजल भिमाची’ हा गझल गायक अशोक गायकवाड यांचा गझलांचा कार्यक्रम होईल. दुपारी 2.30  वाजता स्वप्नील पवार, विशाल ओव्हाळ आणि प्रज्ञा इंगळे यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 4.30 वाजता ‘सामाजिक क्रांती – एक प्रवास’ या विषयावर (Pimpri News) परिसंवादाचे आयोजन केले आहे. यामध्ये अॅड. संभाजीराव मोहिते, प्रा. विनोद इंगळे, प्रा. अशोक भाटकर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता विजय सरतापे यांच्या गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता होईल. जास्तीत-जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने केले आहे.

Latest news
Related news