Pimpri News: स्पर्श आणि जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट रद्द करण्याची पालिका सभेत मागणी

जम्बो, ऑटो क्लस्टरमध्ये रुग्ण गेल्यास परत येतच नाही, नगरसेवकांनी सांगितले स्वानुभव!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पैसे देऊन खासगी संस्थेला संचलन करण्यास दिलेल्या ऑटो क्लस्टर आणि नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये पाठविलेले रुग्ण परत येतच नाही. तर, त्यांचे मृतदेह बाहेर येत आहेत. ही बाब गंभीर असून या दोन्ही सेंटरमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. स्पर्श आणि जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट काढून घेऊन महापालिकेच्या ताब्यात घ्यावे, अशी मागणी सत्ताधारी भाजपसह सर्व पक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी महापालिका सर्वसाधारण सभेत केली.

सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. विकास डोळस म्हणाले, ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापन काढून घ्यावे. हे व्यवस्थापन पालिकेच्या अधिका-यांना विचारत नाहीत. पालिकेचे अधिकारी असह्य, दुर्बल झालेले आहेत. ऑटो क्लस्टर, जम्बोमधील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. तिथे रुग्ण गेल्यास परत येतच नाहीत. रुग्णांना भेटू दिले जात नाही. जेवण व्यवस्थित दिले जात नाही. वायसीएममध्ये रुग्ण बरे होणाचे प्रमाण चांगले आहे.

सुजाता पालांडे म्हणाल्या, जम्बोत पाठविलेले सातही रुग्ण परत घरी आले नाहीत. त्यांचे मृतदेहच आले. शिवसेनेच्या मीनल यादव म्हणाल्या, जम्बोत उपचारासाठी गेलेला एकही रुग्ण परत येत नाही. तिथे कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या, ऑटो क्लस्टर, जम्बोत रुग्ण वाचत नाहीत. तिथे दाखल होणा-या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. उलट वायसीएम, जिजामाता, भोसरी रुग्णालयात रुग्ण बरे होऊन बाहेर येतात.

नीता पाडाळे म्हणाल्या , जम्बोत गेलेला रुग्ण परत येतच नाही. काळेवाडीतील जम्बोत गेलेला एकही रुग्ण परत आला नाही. सीमा सावळे म्हणाल्या, ऑटो क्लस्टर हॉस्पिटल डेडहाऊस झाले आहे. रुग्ण तिथे उपचारासाठी गेल्यावर परत येत नाही.

योगेश बहल म्हणाले, बेड मोकळे असताना ऑटो क्लस्टरमध्ये हाऊसफुल्ल म्हणून सांगत आहेत. ऑटो क्लस्टरमधून सर्वात जास्त रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेर गेले आहेत. त्यांचे एजंट 25 हजार रुपयांना एक इंजेक्शन विकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.