Pimpri News : लोकहो, वाहनचोरीच्या विळख्यात अडकायचं नसेल तर हे करा…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांनी चांगलाच हैदोस घातला आहे. दररोज सरासरी तीन वाहनांची चोरी होत आहे. वाहन चोरटे जणू पोलिसांनाच आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहन धारकांनी आपल्या वाहनांबाबत आणखी सतर्क राहायला हवे.

जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातून 57 वाहने चोरीला गेली. तर ऑगस्ट महिन्यात हा आकडा वाढून 90 एवढा झाला. दिवसेंदिवस वाहनचोरीच्या घटना वाढतच आहेत. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत शहरातून 504 वाहने चोरीला गेली आहेत. हा आकडा पोलीस दप्तरी दाखल झालेल्या वाहन चोरीचा आहे. प्रत्यक्षात वाहन चोरीची संख्या आणखी मोठी असू शकते.

वाहन चोरीच्या विळख्यात अडकायचं नसेल तर खालील बाबींचा अवलंब करा

# अलर्ट सिस्टीम – वाहने पार्क करताना शक्यतो आपण लॉक करतो. चावीशिवाय हे लॉक उघडून वहाने चोरी करून नेली जातात. पण जर अलर्ट सिस्टीम वाहनात असेल तर चावीशिवाय लॉक उघडण्याचा अथवा तोडण्याचा प्रयत्न झाल्यास त्यातून मोठा आवाज येईल. याची माहिती वाहन धारकाला मिळेल.

# जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस – वाहन चोरी झाल्यानंतर त्याचे लोकेशन शोधण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईसची खूप मोठी मदत होते. तसेच भाड्याने दिलेल्या वाहनांचे देखील यावर लोकेशन वाहन मालकाला समजू शकते. चालकाने अथवा भाडेकरूने चलाखी केल्यास तत्काळ पोलिसांच्या मदतीने संबंधितांना पकडता येऊ शकते. तसेच चोरीला गेलेल्या वाहनांचा देखील शोध घेता येईल. पण हे डिव्हाईस अशा ठिकाणी बसवावे, जिथे कुणाचीही नजर जाणार नाही. अन्यथा अनेक जीपीएस डिव्हाईस काढून वाहने चोरी केल्याच्या देखील घटना घडल्या आहेत.

# अतिरिक्त लॉक – पार्किंगमध्ये पार्क करताना किंवा वाहन आपल्या नजरेआड असेल त्या वेळी वाहनाच्या लॉक सोबत आणखी एखादे अतिरिक्त लॉक बसवावे. साखळीने बांधून त्याला कुलूप लावता येईल. तसेच अन्य प्रकारचे लॉक बाजारात उपलब्ध आहे, ते देखील लावता येईल.

# सुरक्षित पार्किंग – आपण ज्या ठिकाणी आपली वाहने पार्क करतो, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची खात्री करावी. सोसायटीच्या पार्किंगमध्ये वाहने पार्क करताना आपली वाहने सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहतील याची खबरदारी घ्यावी. बाहेर वाहने पार्क करताना सीसीटीव्ही असेल अशा ठिकाणी वाहने पार्क करावीत.

वाहने चोरीला जाऊ नये म्हणून काळजी घेण्यासह जुने वाहन खरेदी करताना देखील काही काळजी घ्यायला हवी.

# कागदपत्रांची पडताळणी करा – जुने वाहन खरेदी करताना तुम्हाला काहीजण ‘आता वाहन घ्या, थोड्या दिवसांनी कागदपत्रे आणून देतो’, असे म्हणून कमी किमतीत वाहन विकण्याचा प्रयत्न करू शकतात. कमी किमतीत वाहन मिळत असल्याने आपण त्याला होकार देखील देतो, पण आपण खरेदी करत असलेले वाहन चोरीचे तर नाही ना, याची पडताळणी करण्यासाठी प्रथम कागदपत्रांची मागणी करा.

सध्या अनेकजण कमी पैशात कशी सोय होईल हे पाहतात. पण कमी पैशात होणारी सोय भविष्यात आपली गैरसोय करू शकते. त्यामुळे प्रथम कागदपत्रे पडताळा आणि मगच वाहन खरेदी करा.

# कमी पैशांच्या अमिषाला बळी पडू नका – मागील काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका अट्टल वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. हा चोरटा पाच ते दहा हजार रुपयांना बुलेट सारख्या महागड्या दुचाकी विकत होता. पण जाणीवपूर्वक कमी पैशांना कागदपत्रांशिवाय दुचाकी खरेदी करणा-यांना देखील पोलिसांनी सहआरोपी केले आहे. त्यामुळे काही जणांची कमी पैशांमध्ये बुलेटस्वारी करण्याची हौस जेलवारी करण्याने पूर्ण झाली आहे. त्यामुळे जर कोणी अगदी कमी पैशात वाहने विकत असेल तर त्याची जास्त पडताळणी करा.

# सोशल मिडीयावरून वाहनांची खरेदी शक्यतो टाळा – सोशल मिडीयावर फोटो अपलोड करून ग्राहक शोधायचे, ग्राहक मिळाले की त्यांच्याशी संपर्क करायचा आणि त्यानंतर लगेच सोशल मिडियावरील अकाउंट बंद करायचे. असा फंडा देखील काही वाहन चोर वापरत आहेत. त्यामुळे सोशल मिडीयावरून वाहन खरेदी करत असाल तर सावधान. तुमची फसवणूक देखील होऊ शकते. पूर्ण पडताळणी करूनच पुढील व्यवहार करा.

# वाहन मिळण्यापूर्वीच आर्थिक व्यवहार करू नका – सोशल मिडिया अथवा अन्य वेबसाईटवरून वाहन खरेदी करताना वाहन मिळेपर्यंत आर्थिक व्यवहार करू नका. पैसे मिळाल्यानंतर वाहन विकणारी व्यक्ती अचानक गायब होऊ शकते. पिंपरी-चिंचवड शहरातील एका व्यक्तीने ओएलएक्स वरून एक दुचाकी खरेदी केली. विकणा-या व्यक्तीने त्याला दुचाकी घेण्यासाठी विमानतळावर बोलावले. विमानतळावर आपली दुचाकी मिळणार या आनंदात खरेदी करणारी व्यक्ती लगबगीने गेली. परंतु दोन दिवस थांबून सुद्धा ना त्याची गाडी आली, ना पैसे परत मिळाले, ना गाडी विकणा-या व्यक्तीशी संपर्क झाला.

# कायदेशीर बाबींना महत्व द्या – वाहन खरेदी-विक्री करताना कायदेशीररित्या कागदपत्रांची पूर्तता करा. कागदपत्रांची नोंदणी करा. वाहन खरेदी-विक्री करारपत्र बनवा. तसेच मालकी हक्क बदलून घ्या. कारण भविष्यात वाहनाच्या बाबतीत काहीही झाले तरी प्रथम वाहनाच्या मालकालाच जबाबदार ठरवले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.