Pimpri news: पालिकेकडून केंद्र, राज्य सरकारच्या सूचनांना तिलांजली, गणेशोत्सवाचा सुद्धा होतोय अवमान – प्रशांत शितोळे

कोरोना कालावधीतील हा उत्सव चांगल्या  पद्धतीने करण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस पावले व उपायोजना केल्या पाहिजे होत्या. परंतु, त्या केलेल्या दिसत नाहीत.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने विविध धार्मिक उत्सव कशा प्रकारे साजरे करावेत किंवा करू नयेत या बाबत सूचना दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाकडून त्याचे पालन केले जात नाही. पालिकेतील कोणाला याचे सोयरसुतक नाही असे दिसते. गणेशोत्सवाचा सुद्धा अवमान केला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केली आहे.

बाजूच्या पुणे पालिकेने व्यवस्थित नियोजन केले आहे. दोन्ही पालिकेत एकाच पक्षाची सत्ता असूनही केवळ आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात मलई खाण्याची कामेच मनापासून केली जातात हेच दिसून येत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

शितोळे म्हणतात, महत्त्वाचा उत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा होत असतो. कोरोना कालावधीतील हा उत्सव चांगल्या  पद्धतीने करण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस पावले व उपायोजना केल्या पाहिजे होत्या. परंतु, त्या केलेल्या दिसत नाहीत.

याउलट शेजारीच असलेल्या पुणे महापालिकेने गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना व विसर्जन, गौरी गणपती यांचे चांगले नियोजन केल्याचे दिसून येते.

दोन्ही महानगरपालिकेत एकाच पक्षाची सत्ता असूनही केवळ आपल्या शहरात मलई खाण्याची कामेच मनापासून केली जातात, हेच दिसून येत आहे.

पुणे पालिका प्रत्येक घरात पोटॅशियम कार्बोनेटची पावडर देत असून २० लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो पोटॅशियम कार्बोनेट टाकल्यास सर्व प्रकारच्या मूर्तींचे विघटन होते व दोन दिवसात त्याचा पुन्हा उपयोग होऊ शकतो.

_MPC_DIR_MPU_II

यासाठी घरटी विसर्जन व्हावे म्हणून व नदीघाटावर गणपती विसर्जन होणार नाही याची खबरदारी म्हणून नियोजन केले आहे.तसेच गल्ली बोळांमध्ये फिरते पाण्याचे हौद येणार असून याद्वारे श्री गणपती मूर्तींचे संकलन ,तसेच शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन याचे नियोजन असल्याचे समजते.

पिंपरी-चिंचवड शहरात अशा प्रकारच्या सुज्ञ कल्पनांची वानवा असून सत्ताधारी पक्षाचे नागरिकांना अशा प्रकारची सुविधा व सेवा देण्याची अजिबात इच्छा नाही हेच यातून सिद्ध होते.

नागरिकांची गैरव्यवस्था होऊ नये अशी साधी इच्छा सुद्धा प्रशासन व सत्ताधाऱ्यांची नाही हेच दिसून येते. त्यामुळे या प्रमुख उत्सवाचा सुद्धा अवमान होत आहे हे खेदाने म्हणावेसे वाटते.

कदाचित फुकटचे पुण्य सुद्धा नको. कारण याच्यात कुठलीही मलई दिसत नाही. त्यामुळेच गणपती बाप्पाच्या उत्सवात कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही असे अनेकांना वाटत आहे.

ठराविक ठिकाणी नागरिकांनी गणेश मूर्ती एकत्र कराव्यात म्हणजे नागरिकांचे एकत्र येणे आलेच. असले नियोजन काय कामाचे. नद्यांचे घाट बंद करून दुसरीकडे मूर्ती एकाच ठिकाणी द्या म्हणजे नागरिकांना निमंत्रण व संसर्गाला आमंत्रण हीच गत म्हणावे लागेल.

 उद्या शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या विविध घाटांवर बंदी असूनही गणपती विसर्जन झाल्यास व त्यातून कोरोनाचा संसर्ग संपूर्ण शहरात वाढल्यास त्यास पूर्णपणे प्रशासन व सत्ताधारी जबाबदार असतील.

परंतु ती वेळ येऊ द्यायची नसेल तर एक दिवसात सुद्धा सर्व प्रकारचे नियोजन होऊ शकते. अशा वेळी तातडीने सत्ताधारी प्रमुख ,विरोधी प्रमुख व प्रशासनाने मिळून नियोजन करावे अशी मागणी शितोळे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1