Pimpri News : ‘कुंभार समाजाच्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने अर्थिक मदत द्यावी’

कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सतिश दरेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसीन्यूज : कारोनाच्या पार्श्वभुमीवर कुंभार समाजाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून राज्यातील कुंभार समाज अक्षरशः उध्वस्त झाला आहे. यामुळे शासनाच्या पुनर्वसन विभागामार्फत या समाजाच्या नुकसानीचे पंचनामे करुन कुंभार समाजाला तातडीने मदत करावी, अशी मागणी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सतिश दरेकर यांनी केली आहे.

यासंदर्भात दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिले आहे.

महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या कुंभार समाजाच्या राज्यातील 75 लाख लोकसंख्येपैकी 20 लाखापेक्षा अधिक लोक आपली पिढीजात पारंपारीक कला जोपासून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

आजवर या समाजाने कितीही संकटे आली तरी शासनाकडे मदतीसाठी हात पसरले नाहीत. मात्र, कोविड 19 च्या संकटामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे.

या काळात कुंभार समाजाला मातीचे माठ, रांजण, अक्षय्य तृतियेचे कुंभ विक्री करता आले नाहीत. गणेशोत्सवाची तर हा समाज वर्षभर वाट पाहत असतो व गणेशोत्सवाच्या काळात कुंभार समाज आपले वर्षभराचे आर्थिक नियोजन करत असतो.

मात्र, यंदा कोरोनामुळे व गणेशोत्सवासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे कुंभार समाजाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून हा समाज अक्षरशः उध्वस्त झाला आहे.

कुंभार समाज गणेश मुर्ती तयार करण्याचे काम बारा महिने करत असतो. यासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात कर्जे घेतलेली असतात.

यासंदर्भातील माहिती राज्यातील मंत्री महोदयांना व शासकीय अधिकार्‍यांना असतानाही ऐनवेळी दि. 11 जुलै 2020 रोजी राज्याचे प्रधान सचिव गृह विभाग यांनी गणेशोत्सवाची मार्गदर्शक सुचना जाहिर केली व घरगुती गणेश मुर्ती दोन फुट व सार्वजनिक गणेशोत्सवाची मुर्ती चार फुट उंचीची असावी असे आदेश दिले.

यामुळे तयार असलेल्या मोठ्या मुर्त्यांची विक्री झाली नाही. यातच अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यास परवानगी नाकारल्याने बहुतांश भागात चार फुट उंचीच्या मुर्तीही विक्री न होता पडून राहिल्या आहे.

या शिल्लक मुर्ती पुढील वर्षी विकण्यास प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसल्याने कुंभार समाज खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडला आहे.

राज्यातील कोकण पट्यात चक्रीवादळामुळे मच्छिमारी करता न आल्याने कोळी समाजाला महाराष्ट्र शासनाने 65 कोटी 17 लाख रुपयांचे विशेष अनुदान जाहिर केले आहे. वाहतुक व्यवसायिकांना वाहन कर माफ केला आहे.

अशाच धर्तीवर राज्यातील गणेश मुर्ती तयार करण्याचा व्यवसाय संपुष्टात येवू नये, बेरोजगारी वाढू नये तसेच बारा बलुतेदारमधिल एक घटक असणार्‍या कुंभार समाजावर उपासमारीची वेळ येवू नये.

यासाठी शिल्लक गणेश मुर्तीचे पंचनामे करुन कुंभार समाजाला तातडीने आर्थिक मदत करावी व सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कुंभार समाज सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतिश दरेकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.