Pimpri News: ऑनलाईन पद्धतीने शिकाऊ वाहनचालक परवाना सुविधा तात्काळ सुरू करा – मोढवे

एमपीसी न्यूज – कोरोना काळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात होणारी गर्दी पाहता ऑनलाईन पद्धतीने शिकाऊ वाहनचालक परवाना मिळवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी भाजप वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे – पाटील यांनी केली आहे.

याबाबत पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, नवशिक्या वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) न जाता लर्निंग लायसन्स ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचे आदेश राज्याच्या परिवहन आयुक्तालयाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. मात्र, पिंपरी- चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तशी सुविधा अद्याप उपलब्ध करुन दिलेली नाही.

पिंपरी-चिंचवड आणि परिसरात सुमारे 25 लाख लोकसंख्या आहे. शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याप्रमाणात शिकाऊ वाहनचालक परवाना मिळवण्यासाठी नागरिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आवारात गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आरटीओ’ कार्यालयात ऑनलाईन कामकाजावर भर देण्यात यावा. ‘ई- साइन’ सुविधेच्या मदतीने नागरिकांना पुर्णत: ऑनलाईन प्रक्रिया करता येते. त्याचप्रमाणे ‘लर्निंग लायसन्स’ची चाचणीही घरी बसून देता येणार आहे.

परिवहन आयुक्तालयाने नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरला परिवहन पोर्टलमध्ये दुरूस्ती करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आता लर्निंग लायसन्सची चाचणी आधार क्रमांकाशी जोडली जात आहे. याबाबत पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यवाही झालेली दिसत नाही, असेही मोढवे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.