Pimpri News: ‘प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्यामुळे पालिकेची प्रतिमा मलिन, तातडीने बदली करा’

आमदार लक्ष्मण जगताप यांची 'सीएम'कडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्राथमिक शिक्षण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप आहेत. शैक्षणिक साहित्य खरेदी, खासगी शाळांची मान्यता, शिक्षकांचे संच यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण करुन त्यांनी भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्यामुळे पालिकेची प्रतिमा मलिन झाली असून त्यांची तातडीने बदली करावी. अधिकार काढून त्यांच्या कारभाराची चौकशी करावी. चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना निवेदन पाठविले आहे. त्यात आमदार जगताप यांनी म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या गैरकारभारविरुद्ध व कार्यक्षमतेबाबत अनेक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेक शिक्षक व पालकांनीही वारंवार त्यांच्याकडे शाळेतील फी शुल्क वाढ, आरटीई प्रवेश व पद मान्यता समस्यांबाबत तक्रारी करूनही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याचे दिसून येते.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभार व अकार्यक्षमतेबाबत अनेक शिक्षक,पालक व नागरिकांनी आयुक्त, लोकप्रतिनिधींकडे व्यथा मांडल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शिक्षण विभागातील खरेदी, खासगी शाळांची मान्यता, शिक्षकांचे संच मान्यता याबाबतही मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता करून अनेक प्रकारे आर्थिक भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ज्योत्स्ना शिंदे या पदावर गतिमान व पारदर्शकपणे कारभार करत नाहीत. त्यांना सोपविलेल्या महत्वाच्या पदाचा गैरवापर करत असल्याच्या गंभीर तक्रारी अनेक शिक्षण संस्थांनी केल्या आहेत.

या सर्व गैरप्रकारामुळे व भ्रष्टाचारामुळे अकारण महापालिकेची प्रतिमा मलीन होत आहे. त्यांच्यावर सोपविलेले सर्व कामकाज व अधिकार तात्काळ प्रभावाने काढावेत. त्यांच्या महापालिकेतील कारभाराची चौकशी करून चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.