Pimpri News: कोरोना काळात पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या स्थलांतरासाठी पालिका करणार सूक्ष्म नियोजन

2200 क्यूसेकने होणारा विसर्ग कमी असला तरी भविष्यात पाण्याचा विसर्ग वाढल्यास नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात पिंपरी चिंचवड शहरात पूरस्थिती निर्माण झाली तर त्याविरोधात लढण्यासाठी आतापासूनच दक्षता घ्यायला हवी. यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले असून पालिका कोरोना काळात पुरस्थितीशी लढण्यासाठी सूक्ष्म नियोजन करणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 98 टक्के भरले असून धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने पवना धरणातून रविवारी सकाळपासून 2200 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पवना नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून नदी दुथडी भरून वाहत आहे.

2200 क्यूसेकने होणारा विसर्ग कमी असला तरी भविष्यात पाण्याचा विसर्ग वाढल्यास नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नद्या वाहतात. पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नदी काठच्या रहिवाशांचे महापालिकेच्या वतीने स्थलांतरण केले जाते.

पावसामुळे पवना, मुळा, इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची गरज पडली; तर, महापालिका शाळेत त्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन आहे. स्थलांतरित करताना सुरक्षित अंतर पाळले जाणार आहे. त्यासाठी जास्त शाळांमध्ये कमी लोकांना ठेवावे लागणार आहे.

पूर्वी एका शाळेमध्ये जेवढे नागरिक ठेवत होतो. आता तेवढे नागरिक चार शाळांमध्ये ठेवावे लागणार आहेत. त्यादृष्टीने व्यवस्था करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्याठिकाणी किट ठेवण्यास सांगितले आहे. कारण, स्थलांतरित लोक थोडेफार कपडे घेवून येतात.

पण, प्रत्येकाकडे मास्क, सॅनिटायझर असण्याची शक्यता नाही. त्यामुळे जिथे केंद्र केले जातील. तिथे मास्क, सॅनिटायझर ठेवण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “शहरात पूरस्थिती निर्माण झाली तर नदी काठच्या नागरिकांचे स्थलांतर करावे लागते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा स्थलांतर करताना अधिक सतर्कता बाळगली जाणार आहे. प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करून, पुरेशी दक्षता घेऊन उपाययोजना केल्या जाणार आहेत.”

अग्निशमन विभाग प्रमुख किरण गावडे म्हणाले, “पवना धरणातून सध्या 2200 क्यूसेकने विसर्ग केला जात आहे. यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण होणार नाही. खडकवासला धरणातून 40-45 हजार क्यूसेक आणि पवना धरणातून 8-10 क्यूसेकने पाणी सोडले तर पुणे शहराच्या पुढे नद्यांमध्ये पाण्याचा फुगवटा तयार होतो. हा फुगवटा मागे वाढत जातो आणि मग पूरस्थिती निर्माण होते.

सध्या अजून एवढा मोठा विसर्ग होत नाही. त्यामुळे फार काळजी करण्याचे कारण नाही. तरीही दक्षता म्हणून पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन विभाग तयारी करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.