Pimpri News: ‘झेड’ शेरांकन असलेल्या टपालावर सात दिवसात; ‘झेड प्लस’ शेरांकनवर 48 तासात कार्यवाही

आयुक्त राजेश पाटील यांचा विभागप्रमुखांना आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकार, इतर माध्यमातून होणा-या पत्रव्यवहारातील टपालांवर ‘झेड’ आणि ‘झेड प्लस’ असे शेरांकन केले जाणार आहे. ‘झेड’ शेरांकन असलेल्या टपालावर सात दिवसात, तर ‘झेड प्लस’ शेरांकन असलेल्या टपालावर 48 तासाच्या आत विभागप्रमुखांनी कार्यवाही करावी, असा आदेश आयुक्त राजेश पाटील यांना दिला आहे. प्रशासकीय गतीमानतेसाठी हा निर्णय घेतला असून आवश्यक प्रकरणी व्हॉट्सअपद्वारे देखील टपाल संबंधितांकडे पाठविले जाणार आहे

महापालिकेकडील विविध कामकाजाबाबत आयुक्त कार्यालयात पोस्टाद्वारे, ई-मेलद्वारे, शासन व अन्य माध्यमांकडून अर्ज किंवा टपाल प्राप्त होते. या टपालावर महापालिका सारथी, पीजी, आपले सरकार पोर्टवरील तक्रारी, प्रकरणांवर कामकाजात होणारा विलंब टाळून सर्व प्रकारच्या प्रकरणांचा त्वरित निपटारा करणे. विशिष्ट कालमर्यदेत प्रकरणे निर्गत करण्यासाठी आयुक्तांमार्फत झेड शेरांकन करण्यात येत होते.

महापालिका प्रशासकीय कामकाजात गतीमानता येवून नागरिकांकडून येणा-या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही व्हावी. तक्रारीचे निराकण होण्यासाठी यापुढे विभागाकडे येणा-या टपालांवर ‘झेड’ किंवा ‘झेड प्लस’ असे शेरांकन केलेले असल्यास अशा टपालांचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागप्रमुखांनी ‘झेड’ शेरांकन असलेल्या टपालावर कार्यालयीन कामकाजाच्या सात दिवसात आणि ‘झेड प्लस’ शेरांकन असलेल्या टपालावर 48 तासाच्या आत कार्यवाही करावी. तसेच मुदतीपूर्वी आयुक्तांकडे फाईल सादर करावी, असा आदेश देण्यात आला आहे.

सध्या महापालिकेच्या कामकाजात जास्तीत-जास्त संगणक प्रणालीचा वापर करुन कामकाज करावयाचे आहे. तसेच प्राप्त झेड किंवा झेड प्लस शेरांकनाचे टपाल आयुक्त कक्षामार्फत तत्काळ विभागाकडे पाठविण्यात येईल. आवश्यक प्रकरणी व्हॉट्सअपद्वारे देखील टपाल संबंधितांकडे पाठविले जाणार आहे.

त्यामुळे विभागातील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचा-यांनी प्राप्त होणारे टपालांवर कार्यवाही करावी. प्रकरणे किंवा सदर्भ निकाली काढताना गुणवत्तेशी तडजोड करण्यात येवू नये, असेही आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

प्रत्येक प्रकरणांची नियम, अधिनियम, शासन निर्णय, परिपत्रकातील तसेच महापालिका अधिनयमातील तरतुदीनुसार गुणवत्तापूर्वक तपासणी करुन संबंधितांना लेखी पूर्तता अहवाल सादर करुन सदरची प्रकरणे ऑनलाईनद्वारे निकाली काढण्यात यावीत.

या कामकाजावर दक्षता व गुण नियंत्रण विभागाच्या उपायुक्तांच्या नियंत्रण राहील. झेड आणि झेड प्लस प्रकरणी विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दक्षता व गुण नियंत्रण विभागाकडे वेळेत व मुदतीत पाठविण्याची विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी. उपायुक्तांनी वेळोवेळी आयुक्तांकडे अहवाल सादर करावा. या निर्देशांचे मुदतीत पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमाधीन कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.