Pimpri News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महापालिकेच्या वतीने STIC चे उद्घाटन

एमपीसी न्यूज – कोरोनानंतर जशी आपली जीवनशैली बदलली तशीच व्यवसाय व नोकरी करण्याची पद्धत देखील बदलत आहे. रोजगाराच्या नव्या संधी मिळविण्यासाठी तरुण पिढीने सद्यपरिस्थितीत काही विशेष कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. नेमकी हीच गरज ओळखून स्मार्ट सिटी उपक्रमाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने संयुक्तपणे ‘STIC’ अर्थात स्मार्ट ट्रेनिंग अ‍ॅण्ड इनोव्हेशन सेंटर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीत छत्रपती शिवाजी सभागृहात या उपक्रमाचा शुभारंभ पार पडला. महापौर उषा ढोरे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. नितीन करमळकर यांच्या हस्ते संयुक्तपणे याचे उद्घाटन करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप, आयुक्त राजेश पाटील, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रो. एन. एस. उमराणी, कुलसचिव प्रो. प्रफुल्ल पवार, विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर आदी उपस्थितीत होते.

रोजगार शोधणाऱ्यांच्या क्षमतांचा विकास होण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रासाठी कार्यक्षम मनुष्यबळ निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. याद्वारे जागतिक स्तरावर रोजगाराभिमुख व कौशल्यावर आधारित मॉड्यूल तयार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रो. करमळकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, “कोरोना काळात शिक्षण व रोजगार यांची परिभाषा बदलली. आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन माध्यमामधून रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे, यासाठी आवश्यक स्कील्स आत्मसात करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असा आमचा विश्वास आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मोलाचे सहकार्य आम्हाला मिळाले असून प्रत्यक्ष प्रशिक्षणासोबतच औद्योगिक, अशास्त्रीय, सामाजिक अशा इतर कौशल्यांच्या विकासावर यामध्ये भर देण्यात येईल. आज 4 अभ्यासक्रम सुरू होत असले तरी विद्यापीठा तर्फे नजीकच्या भविष्यात 2 वेगवेगळ्या ऑनलाईन व्यासपिठांच्या माध्यमातून 400 हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची योजना आहे .”

उषा ढोरे म्हणाल्या की, केवळ शहरे नाही तर नागरिकांना स्मार्ट करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल आहे. पैशांच्या अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना असे अभ्यासक्रम करणे अनेकदा शक्य होत नाही. मात्र या उपक्रमाद्वारे आता ते शक्य होऊ शकेल.

उपक्रमांतर्गत हे आहेत अभ्यासक्रम!
सदर उपक्रमा अंतर्गत पहिल्या 4 अभ्यासक्रमामध्ये मायक्रोसॉफ्ट – अझ्यूर क्लाऊड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, रेडहॅट – लिनक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, सॅप एबीएपी व एमएम फॉर अकाउंट्स, फायनान्स अँड बॅक ऑफिस आणि ऑटोकॅड इन डिझाईन इन ऑटोडेस्क यांचा समावेश आहे. सुरुवातीला काही लाइव्ह आणि रेकोर्ड केलेल्या सत्रांसह हा अभ्यासक्रम ऑनलाईन असेल. लवकरच ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने मिश्रित स्वरूपात प्रशिक्षण दिले जाईल. सध्या खाजगी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांच्या किंमतीपेक्षा 35 ते 40 % इतक्या कमी किंमतीत हे अभ्यासक्रम सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहेत. सदर उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्याने पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उपक्रमाची अधिक माहिती ही  http://www.sticonline.in  या संकेतस्थळावर मिळू शकेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.