Pimpri News: शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेत गोविंद घोळवे यांना सामावून घ्या : संजय राऊत

एमपीसी न्यूज – शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे हे गेली 30 ते 35 वर्षे पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत आहेत. जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, ओबीसी समाजाचा चेहरा आहेत. भगवान गडाचे सचिव आहेत. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा. महापालिका निवडणुकीत त्यांना विश्वासात घ्यावे, असे आदेश शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिले.

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना नेते, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आकुर्डीत तीनही विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिका-यांचा मेळावा झाला. खासदार श्रीरंग बारणे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यावेळी उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावयचा आहे. त्यासाठी आपआपसातील मतभेद, गटबाजी बाजूला ठेवा. हेवेदावे, द्वेष करणे बंद करा. एक दिलाने काम करावे.

उपनेते रवींद्र मिर्लेकर म्हणाले, गोविंद घोळवे यांचा संपर्क दांडगा आहे. त्यांच्या संपर्काचा, पत्रकारितेतील अनुभवाचा शिवसेनेला उपयोग व्हावा, यासाठी पक्षाने त्यांना राज्यसंघटक केले आहे. त्यांचे राज्य स्तरावरील नेतृत्व आहे. पक्ष संघटना वाढीसाठी घोळवे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. ते पिंपरी-चिंचवड कामगार नगरीत वास्तव्यास असून शिवसेनेच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत त्यांना सामावून घ्यावे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी सभा, बैठका, मेळाव्याचा धडाका लावा. त्यात घोळवे यांचे मार्गदर्शन घ्यावे, असेही ते म्हणाले.

गोविंद घोळवे म्हणाले, भाजपने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा व शास्तीकर माफीच्या निव्वळ घोषणा केल्या. त्याची अंमलबजावणी झाली नाही. पिंपरी-चिंचवडकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजपने केले आहे. आपल्याला भाजपकडून सत्ता खेचून घेत शिवसेनेचा महापौर करायचा आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी व्हावी हे माझे वैयक्तिक मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे धडाडीचे नेते असून त्यांच्या प्रयत्नाने शहराचा विकास कायापालट झाला आहे, असेही घोळवे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.