Pimpri News: वायसीएमएच, ॲटो क्लस्टर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची गैरसोय; धनंजय आल्हाट यांचा आरोप

जम्बो कोविड केअर सेंटर तत्काळ सुरु करा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच आणि ॲटो क्लस्टर येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होत आहे. रेमडेसिवर इंजेक्शन उपलब्ध नसते. त्यामुळे रुग्णांच्या जिवीताला धोका निर्माण होवू शकतो. या ठिकाणी रुग्णांना योग्य ती सेवा मिळावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांनी दिला आहे. तसेच जम्बो कोविड केअर सेंटर तत्काळ सुरु करण्याची मागणीही त्यांनी केली.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात आल्हाट यांनी म्हटले आहे की, मागील 15 दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वायसीएम रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांना आवश्यक उपचार मिळत नाहीत. त्यामुळे नातेवाईक हताश झालेले आहेत.

सध्या वायसीएमएचमध्ये केवळ 120 जनरल बेड उपलब्ध असून यामध्ये केवळ 30 बेड आयसीयु विभागात आहेत. त्यामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात स्थलांतरीत केल्याशिवाय नातेवाईकांकडे पर्याय नसतो. हा रुग्णांच्या जीवाशी खेळ होत आहे.

11 मार्चपासून वायसीएम रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांना रेमडेसिवर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नातेवाईकांच्या भावना तीव्र आहेत.

ॲटो क्लस्टरमध्येही अशीच परिस्थिती असून रुग्णांना कोणतीही सेवा मिळत नाही. त्यामुळे तत्काळ जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्यात यावे. वायसीएमएच आणि ॲटो क्लस्टर येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोविड रुग्णांना योग्य ती सेवा मिळावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही आल्हाट यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.