Pimpri corona News: मागील आठ दिवसांत कोरोनाच्या एक हजार रुग्णांची वाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा कोरोनाचा धोका वाढताना दिसून येत आहे. मागील आठ दिवसात शहरात एक हजार 28 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दुस-या लाटेची हलकी सुरवात असल्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांचे बेफिकीरीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना अधिक दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे.

मागीलवर्षी राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आढळला होता. 10 मार्च रोजी एकाचदिवशी तीन रुग्ण सापडले होते. त्यानंतर शहरातील रुग्णसंख्येत प्रचंड वेगाने वाढ झाली. शहरात कोरोनाने हाहा:कार माजविला होता.

दिवाळीनंतर शहरातील रुग्णसंख्येत घट होत होती. 100 च्या आतमध्ये रुग्णसंख्या आली होती. परंतु, आता पुन्हा 2021 मध्ये शहरात कोरोनाचा धोका वाढताना दिसून येत आहे.

मागील आठ दिवसात शहरात एक हजार 28 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसाला 100 नवीन रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. नागरिकांमध्ये बेफिकीरी वाढली असून गर्दी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. सार्वजनिक कार्यक्रमात नियमांचे पालन होताना दिसून येत नाही.

अनेक नागरिक मास्कविना फिरत आहेत. सुरक्षित अंतराचे पालन होत नाही. रुग्णसंख्या वाढल्याने कठोर निर्णय घेण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून दिले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची मोठी आवश्यकता आहे.

आजपर्यंत शहरातील 1 लाख 2010 जणांना कोरोनाची लागण

आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील 1 लाख 2010 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 98 हजार 63 जण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत शहरातील 1827 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 771 अशा 2598 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 708 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ”कोरोनाच्या रुग्णसंख्येत थोडी वाढ होत आहे. कोरोना वाढू नये यासाठी नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या नियमांचे पालन करावे.

मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. सुरक्षित अंतर पाळावे. गर्दी करणे टाळावे. सर्दी, ताप, खोकला असल्यास त्वरित रुग्णालयात जावून तपासणी करावी. आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी कोरोनाची लस टोचवून घ्यावी”.

वैद्यकीय क्षेत्रातील 14 हजार 155 जणांनी घेतली लस !

कोरोनावर लस आली असून पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लस दिली जात आहे. आरोग्य सेवा पुणे मंडळ यांच्याकडून कोविड 19 लसीकरणासाठी महापालिकेला 15 हजार डोस प्राप्त झाले आहेत.

महापालिका, खासगी रुग्णालयातील अशा 17 हजार 792 आरोग्य सेवा देणा-या लाभार्थींची महापालिकेकडे नोंदणी झालेली आहे. आजपर्यंत 14 हजार 155 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.