Pimpri News: वैद्यकीय, आरोग्य विभागासाठी तरतूद वाढवा – विलास लांडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2021-22 मधील अर्थसंकल्पात अनेक त्रुटी आहेत. त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी. वैद्यकीय आणि आरोग्य विभागासाठीची तरतूद कमी आहे. त्यामध्ये भरीव वाढ करावी, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.

वैद्यकीय ऐवजी सत्ताधा-यांच्या टक्केवारीसाठी महसुली व भांडवली खर्चावर जास्त तरतूद केलेली दिसून येत आहे. हा प्रकार म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळुवरचं लोणी खाण्यासारखा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात लांडे यांनी म्हटले आहे की, महापालिकेचे माजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अर्थसंकल्पातील चुकांना तोंड द्यावे लागत आहे. मार्च 2020 पासून कोरोना महामारीचे संकट संपूर्ण विश्वावर कोसळले आहे. शहरात एक लाखाच्यावरती नागरिक कोरोनाबाधीत झालेले आहेत.

अठराशे पेक्षा जास्त नागरिकांना या कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागलेला आहे. एवढीमोठी भयावह आकडेवारी असून व संपूर्ण लसीकरण होईपर्यंत कोरोनाचे सावट राहणार असल्याने वैद्यकीय विभाग व आरोग्य विभागासाठी केलेली तरतुद अत्यंत कमी आहे.

मागील वर्षापेक्षा वैद्यकीय, आरोग्य विभागासाठी तरतूद अतिशय कमी केली आहे. विभागासाठी कमी तरतूद करणे म्हणजे सर्वसामान्य नागरीकांची या कोरोना महामारी संकटाच्या काळात केलेली थट्टा आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकात वैद्यकीय विभाग व आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद करणे गरजेचे होते.

मात्र, सत्ताधा-यांच्या टक्केवारीसाठी महसुली व भांडवली खर्चावर जास्त तरतूद केलेली दिसून येत आहे. हा प्रकार म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळुवरचं लोणी खाण्यासारखा आहे. मी या अक्षम्य चुकीबद्दल सत्ताधा-यांचा निषेध करतो, असे लांडे यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.