Pimpri News: कोरोना काळात खासगी रुग्णांलयांनी घेतली वाढीव बिले ; लेखापरीक्षणांनंतर 2031 वाढीव बिलात झाली कपात

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षण कार्यालयातील कर्मचा-यांनी 13 जुलै ते 1 नोव्हेंबर या कालावधीत शहरातील 29 खासगी रूग्णालयांमधील 2 हजार 333 प्रकरणांची तपासणी केली. त्यामध्ये 2 हजार 31 वाढीव बिले कमी करण्यात आली. तर, 302 बिलांची संपूर्ण पूर्तता करण्यात आली. 3 कोटी 24 लाख 96 हजार रूपये बिलं कमी करण्यात आले.

तर, 13 कोटी 23 लाख 66 हजार रूपये बिलं प्रत्यक्षात भरण्यात आले. दरम्यान, वाढीव बिले घेणा-या आणि ती कमी न करणा-या रुग्णालयांवर प्रशासन कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

कोरोना विषाणूच्या आपत्तीत कोरोना रूग्णांवर उपचार करणा-या खासगी रूग्णालयांमार्फत आकारण्यात येणा-या बिलांची पूर्व आणि पश्चात तपासणी करण्यासाठी मुख्य लेखापरिक्षण कार्यालयातील कर्मचा-यांच्या प्रभागनिहाय नेमणूका करण्यात आल्या होत्या.

शहरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून साथ रोग अधिनियम तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम लागू करण्यात आला होता.

या अधिनियमाअंतर्गत 29 जुलै 2020 रोजीच्या आदेशानुसार महापालिका हद्दीतील खासगी रूग्णालयांमार्फत आकारण्यात येणा-या बिलांची पूर्वतपासणी आणि पश्चात तपासणी करण्याबाबत आदेश जारी केले होते. त्या अनुषंगाने मुख्य लेखापरिक्षण कार्यालयातील कर्मचा-यांच्या प्रभागनिहाय नेमणूका करण्यात आल्या होत्या.

तसेच काही कर्मचा-यांच्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या अंतर्गत नेमणूका करण्यात आल्या होत्या. 13 जुलै ते 1 नोव्हेंबर या कालावधीत मुख्य लेखापरिक्षण कार्यालयातील कर्मचा-यांनी कोरोना रूग्णांसाठी खासगी रूग्णालयांमार्फत आकारण्यात येणा-या बिल तपासणीच्या कामकाजाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यानुसार, या कालावधीत केलेल्या साप्ताहीक कामकाजाचा अहवाल तयार करण्यात आला आहे.

‘या’ रुग्णालयातील बिले केली कमी !

पिंपरीतील डी. वाय. पाटील रूग्णालयाने 249 बिले सादर केली होती. ती सर्व बिले कमी करण्यात आली. आकुर्डीतील स्टर्लींग रूग्णालयाने 253 बिले सादर केली. त्यापैकी 132 बिले कमी करण्यात आली. तर, 121 बिलांची पूर्तता करण्यात आली. आदित्य बिर्ला रूग्णालयातील 101 बिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 100 बिले कमी करण्यात आली.

ओजस रूग्णालयाच्या 165 बिलांपैकी 110 बिलांची रक्कम कमी करण्यात आली. खासगी रूग्णालयांच्या बिलांची पूर्वतपासणी आणि पश्चात तपासणी लेखापरिक्षण करण्यात आले असता 2 हजार 144 प्रकरणांमध्ये 16 कोटी 48 लाख 51 हजार रूपये प्रत्यक्षात बिलांची रक्कम होती.

तपासणीत त्यापैकी 3 कोटी 24 लाख 96 हजार रूपयांची बिले कमी करण्यात आली. तर, 13 कोटी 23 लाख 66 हजार रूपये बिल प्रत्यक्षात भरण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.