Pimpri News: अपक्षांच्या गटनेत्याची महासभेला दांडी अन् स्थायी सदस्य नियुक्तीवरून महासभेत गदारोळ

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या स्थायी समितीत अपक्ष आघाडीच्या सदस्य नियुक्तीवरुन महासभेत गदारोळ झाला. गटनेत्याने पत्र दिले नसताना अपक्ष सदस्याचे नाव कसे घोषित करता, असा प्रश्न विचारत शिवसेना गटनेते राहुल कालाटे यांनी नियुक्तीस विरोध केला. त्यांना राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही साथ दिली. यावेळी नगरसेवकांनी मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला. एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने गोंधळ वाढला. या गोंधळामुळे महापौरांनी सोमवारपर्यंत सभा तहकूब केल्याचे जाहीर केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका फेब्रुवारी महिन्याची सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी) आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

स्थायी समितीतील आठ सदस्यांचा कार्यकाल संपल्याने आजच्या महासभेत नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या गटनेत्यांनी आपल्या सदस्यांची नावे बंद पाकिटातून महापौरांकडे दिल्यानंतर महापौरांनी सदस्यांची नावे घोषित केली.

मात्र, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे सभेला गैरहजर होते. त्यामुळे आघाडीतील नीता पाडाळे यांनी स्थायी नियुक्तीसाठी त्यांचे नाव असलेले पत्र महापौरांना दिले.

सदस्यांची नावे देण्याचा अधिकार गटनेत्यांना असतो. त्यानुसार अपक्ष आघाडीतील सदस्याचे नाव गटनेत्याने दिले नाही. त्याबाबत खुलासा करण्याची मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केला. त्यावर नगरसचिव उल्हास जगताप यांनी खुलासा केला.

_MPC_DIR_MPU_II

महापौरांनी अपक्ष नगरसेविकेचे नाव स्थायीसाठी घोषित करण्याचे निर्देश जनता संपर्क अधिका-याला दिले. त्याला आक्षेप घेत कलाटे यांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली.नाव घोषित करण्यास विरोध केला. राष्ट्रवादी आणि अपक्ष सदस्यांनाही मोठा विरोध केला.

कलाटे आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. भाजपचे नगरसेवकही महापौरांच्या आसनासमोर जमा झाले होते. सुमारे अर्धा तास सभागृहात गोंधळ सुरू होता. महापौरांसमोरील मानदंड पळविण्याचा नगरसेवकांनी प्रयत्न केला. शेवटी विरोध डावलून तसेच गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना निलंबनाचा इशारा देत महापौरांनी अपक्ष सदस्याचे नावही घोषित केले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘गटनेत्यांनीच बंद लिफाफ्यातून सदस्यांची नावे द्यावीत, असा नियम आहे. गटनेता उपस्थित राहू शकणार नसेल तर त्याने सभेपुर्वी महापौर आणि आयुक्तांकडे रजेचा अर्ज देणे आवश्यक आहे. तसेच समितीत नियुक्त करणा-या सदस्याच्या नावाचा बंद लिफाफा देणे गरजेचे आहे.

मात्र, अपक्ष गटनेते कैलास बारणे यांनी असे केले नाही. त्यांचा रजेचा अर्जही नाही. त्यामुळे भाजपने अपक्ष गटाच्या सदस्यांच्या नावाची घोषणा करणे चुकीचे आहे. या निर्णयाला कायदेशीर आव्हान देणार आहे”.

अपक्ष आघाडातील नगरसेवक नवनाथ जगताप म्हणाले, ”आघाडी स्थापन होताना पाचही सदस्यांना दरवर्षी स्थायी संधी देण्याचे ठरले होते. गटनेत्यांनी नाव देणे अपेक्षित आहे. चर्चा करुन निर्णय घेता आला असता पण गटनेतेच गैरहजर राहिले”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment