Pimpri News: पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षात भारत आत्मनिर्भर झाला – संजीवनी पांडे

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षात देश ‘इंडिया’चा ‘आत्मनिर्भर भारत’ बनला, या शब्दांत भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्ष संजीवनी पांडे यांनी विरोधकांच्या टिकेला खणखणीत उत्तर दिले आहे.

मोदी सरकारने सात वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने आज देशभर आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी सात वर्षात काहीही केेले नाही, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संजीवनी पांडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे विरोधकांच्या टिकेला उत्तर दिले.

सात वर्षांत काय झाले हे एका वाक्यात सांगायचे तर देश ‘इंडिया’ से ‘आत्मनिर्भर भारत’ बनला असे म्हणता येईल, असे पांडे यांनी पत्रकात म्हटले आहे. करोना महामारीच्या जागतिक संकटामुळे नागरिक शारीरिक व आर्थिक विवंचनेत जरूर सापडला आहे, पण मानसिक स्तरावर अधिक सक्षम होऊन देशाचा प्रत्येक नागरिक आज स्वतः ला आशावादी आणि गौरवान्वित समजत आहे, असा दावा पांडे यांनी केला आहे.

स्वतः च्या ‘वोट बँक’साठी काँग्रेसने वर्षानुवर्षे अनेक प्रश्नांचे घोंगडे भिजत घातले होते. गेल्या सात वर्षात पंतप्रधान मोदी यांनी ते घोंगडे पिळून, सुकवून, वाळवून काढले गेले. काश्मीरमधील 370 वे कलम असो, अयोध्येतील राम मंदिर निर्माण असो, ‘तीन तलाक’प्रश्नी अल्पसंख्यक महिला-भगिनींना न्याय असो, किंवा सवर्ण समुदायाला आर्थिक निकषावर 10 टक्के आरक्षण, असे धडाडीचे निर्णय सात वर्षांत झाले. त्याचबरोबरच सर्जिकल स्ट्राईक, हवाई स्ट्राईक सारख्या मोहिमांनी सैन्याचे मनोधर्य उभारणी जागतिक स्तरावर भारताच्या संरक्षण दलाची सक्षम प्रतिमा उभारणीचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले, याकडे पांडे यांनी लक्ष वेधले.

जन धन खात्यामार्फत शासकीय योजनेचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थींपर्यन्त पोहोचणे, ‘वन नेशन, वन टॅक्स’, ‘वन रँक, वन पेंशन’ हे सर्व निर्णय म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे द्योतक आहे, असे पांडे यांनी म्हटले आहे. या शिवाय 100 वर्षांतून एखाद्या वेळी येणार्‍या महामारीसारख्या जागतिक संकटातही अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एन्टोनी ब्लिंकन यांनी भारताबद्दल काढलेले, “कोरोना च्या प्रारंभिक काळात भारताने अमेरिकेला साथ दिली, ते अमेरिका कधीही विसरणार नाही व आता अमेरिकेची जबाबदारी आहे की भारताला कसलीही गरज लागेल तेव्हा आम्ही भरताच्या पाठीशी असेल”, हे गौरवपूर्ण उद्गार विसरून चालणार नाही. पंतप्रधान मोदीच्या प्रभावी परराष्ट्र धोरणाचा हा परिपाक आहे, असे पांडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

त्या शिवाय ऑक्सिजन ट्रेन, हवाई मार्गाने जलद गतीने इंजेक्शन्स व इतर औषधसामग्रीचे वितरण या सर्व बाबींची इतिहासात नोंद होणार आहे. कोविडमुळे पालकांचे छत्र गमावलेल्या निराधार बालकांसाठी व परिवारांसाठी झालेले निर्णय म्हणजे तर मंदिरावर कळस म्हटले जातील. अजूनही बरेच काही आहे पण एक गोष्ट नक्की आहे की, प्रचंड राजकीय इच्छाशक्ती असेल तर काहीही घडवता येते, हेच पंतप्रधान मोदी यांनी गेल्या सात वर्षात सिद्ध करून दाखवले आहे, असे पांडे यांनी शेवटी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.