Pimpri News: ऑस्ट्रेलियातील भारतीय अभियंत्याची कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदत; लोकमान्य हॉस्पिटलला पाच पॅरामीटर असलेले मॉनिटर भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता मूळ शहरातील रहिवासी पण ऑस्ट्रोलियात अभियंता असलेले विजय चौधरी मदतीसाठी धावून आले आहेत. अतिदक्षता विभागातील रुग्णांची तपासणी करता येणारे पाच पॅरामीटर असलेले मॉनिटर त्यांनी खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशनकडे दिले.

फाउंडेशनचे सचिव रवी नामदे आणि उद्योजक प्रताप बारणे यांनी लोकमान्य हॉस्पिटलचे ऍडमीन ब्रिजेश शुक्ला, डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्याकडे आज (गुरुवारी) हे मॉनिटर सुपूर्द केले.

मूळ पिंपरी-चिंचवडचे रहिवासी असलेले विजय चौधरी सध्या ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहेत. ते अभियंता आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने चिंतेत होते. कोरोना काळात खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशन करत असलेल्या कार्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे आपणही काहीतरी मदत करून या महामारीत खारीचा वाटा उचलावा अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली.

विजय चौधरी यांनी सोशल फाउंडेशनशी संपर्क साधला. पाच पॅरामीटर असलेले मॉनिटर भेट देण्याकरिता खरेदीसाठी त्यांनी फाऊंडेशनकडे पैसे दिले. फाऊंडेशनने पॅरामीटर खरेदी करून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या लोकमान्य हॉस्पिटलकडे सुपूर्द केले. पाच पॅरामीटर असलेल्या मॉनिटरद्वारे अतिदक्षता विभागातील रुग्णांचे ईसीजी, आरआर, आयबीपी, सॅच्युरेशन, प्लस तपासण्याची सुविधा आहे.

विजय चौधरी म्हणाले, “भारतातील आपले बांधव कोरोनाने त्रस्त आहेत. या संकटकाळी आपल्या जन्मभूमीतील नागरिकांसाठी काहीतरी मदत केली पाहिजे. खारीचा वाटा उचलला पाहिजे. त्यासाठी पॅरामीटर देण्याचे निश्चित केले. ते कसे द्यायचे हा प्रश्न होता. खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशन कोरोना काळात चांगले कार्य करत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या सहकार्याने कोरोना हॉस्पिटल सुरू केल्याची बातमी वाचली. त्यामुळे पाच पॅरामीटर असलेले मॉनिटर लोकमान्य हॉस्पिटलला देण्यासाठी फाउंडेशनकडे दिले. त्यांनी आज हॉस्पिटलकडे सुपूर्द केले. या महामारीविरोधात केंद्र, राज्य सरकार पूर्ण ताकदीने लढत आहेत. पण, नागरिकांनाही सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे. मूळ शहरातील पण परदेशात असलेल्या नागरिकांनी आपल्या जन्मभूमीला मदत करावी” असे आवाहनही त्यांनी केले.

रवी नामदे म्हणाले, “पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. स्थानिक प्रशासन कोरोनाविरोधातील लढाई लढत आहे. पण, त्यांच्यावरही ताण आहे. ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी हातभार लावणे आवश्यक आहे.

ऑस्ट्रेलियात असलेल्या विजय चौधरी यांची शहराशी असलेली नाळ तुटली नाही. संकटात जन्मभूमीतील नागरिकांच्या मदतीला ते धावून आले आहेत. त्यांचे मी आभार मानतो”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.