Pimpri News : ‘महंगाई डायन खाये जात है’ ; सर्वसामान्य जनतेच्या खिशाला झळ

एमपीसी न्यूज (प्रमोद यादव) – लॉकडाऊननंतर देशात महागाई डोकं वर काढेल, अशी शक्यता काही तज्ञ मंडळींनी व्यक्त केली होती. ती शक्यता आता हळूहळू समोर येऊ लागली आहे. सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दर वाढ झाली आहे.  या वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य जनतेच्या खिशाला बसत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या काळात अनेकांच्या पगारात कपात झाली तर कित्येकांना आपला जॉब गमावावा लागला. जीवघेण्या कोरोना सोबतच सर्वांपुढे आर्थिक संकट देखील उभे आहे. त्यामुळे प्रत्येकावर ‘महंगाई डायन खाये जात है’ असे म्हणायची वेळ आली आहे.

मागील सात ते आठ महिन्यापासून भारतच नव्हे तर सर्व जग कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. या काळात लाखोंच्या संख्येत जीवितहानी झाली. कडक लॉकडाउन आणि आर्थिक संकट या दोन्ही समस्या हातात हात घालून समोर उभ्या राहिल्या. देशात हळू हळू अनलॉक लागू करत लॉकडाउन शिथिल करण्यात आला.

आज घडीला देशात कोणातेही निर्बंध नाहीत. मात्र, सर्वसामान्य नागरिक महागाईने त्रस्त आहे. रोजच्या वस्तू विकत घेणं परवडेनासे झाले आहे. सर्वच क्षेत्रात दर वाढ करण्यात आली आहे. जीवनावश्यक किराणा, भाजीपाला ते गॅस, पेट्रोल आणि खासगी डॉक्टरांच्या तपासणी फी देखील मोठ्याप्रमाणात वाढवण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सलून व्यवसाय बंद होता. सुरक्षेची काळजी घेत हा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली. मात्र, केस कर्तन आणि दाढी करण्यासाठी जिथं सुरवातीला 50 ते 100 रुपये लागायचे ते आता 200 ते 250 रुपये एवढे आकारले जातात. बरं याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून किती काळजी घेतली जाते हा वेगळा आणि संशोधनाची विषय आहे.

गाडीच्या चाकात हवा भरण्यासाठी अगोदर पाच रुपये लागायचे त्यासाठी आता दहा रुपये मोजावे लागतात. जीवनावश्यक किराणा साहित्य, डाळी, तेल, भाजीपाला यांचे दर देखील पूर्वीपेक्षा वाढले आहेत. शिवाय घरगुती गॅसचे दर वाढवण्यात आले असून ते परवडेनासे झाले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पेट्रोलचे दर तर गगनाला भिडले आहेत, सध्या एक लिटर पेट्रोलचे दर 91 रुपयांच्या घरात आहेत. सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने वाहन वापरण्याशिवाय पर्याय नाही. अशात पेट्रोलचे वाढलेले दर वाहन चालकांना चटके देत आहे.

बँकेची गरज सर्वांनाच असते. बँकेच्या ज्या सेवा आपण वापरतो त्या बदल्यात बँक वार्षिक किंवा मासिक शुल्क आकारणी करते. या विविध सेवा शुल्कात देखील बॅकांनी वाढ केली असून, ही वाढ लवकरच लागू होणार आहे.

काही खासगी डॉक्टरांनी तपासणी शुल्क जवळपास दीडपट वाढवले आहेत. त्यामध्ये स्पेशालिस्ट डॉक्टरांचे दरपत्रकही बदलले आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना महागड्या वैद्यकिय चाचण्या, तपासणी व उपचार खिशाला परवडेनासे झाले आहेत.

कोरोनामुळे सर्वच विद्यार्थांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. अशात सिम कार्ड कंपन्यानी त्यांच्या रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी वेगळा मोबाईल आणि वेगळा रिचार्ज आला. शिक्षण हे महत्वाचे आणि गरजेचा असा भाग असल्याने हा वाढीव खर्च पालकांना टाळणे अशक्य झाले आहे. याशिवाय कोरोनामुळे इतर वाढीव खर्चात वाढ झाली आहे. जसे मास्क, हॅन्ड सॅनिटायझर किंवा हॅन्ड वॉश हा देखील मासिक खर्च वाढला आहे.

 

‘सध्याच्या काळात ब्युटी पार्लरमधील दर सुद्धा वाढले आहेत. छोट्या कामासाठी पण जास्त पैसे मोजावे लागत आहेत. स्वच्छता राखण्यासाठी पार्लरवाल्यांना सर्व ‘युझ आणि थ्रो’ ची साधनं वापरावी लागत आहेत, त्यामुळे तो खर्च ते ग्राहकांकडून भरून घेत आहेत. त्यामुळे पार्लरसाठी जादा पैसे जात आहेत. मास्क, सॅनिटायझर यासाठी देखील अतिरिक्त खर्च होत आहे.’ – दिव्या भंडारे – नागरिक

‘काही वस्तू, सेवा एकरकमी घेणं शक्य नसल्याने हप्त्याने घेतल्या आहेत. त्याचे प्रत्येक महिन्याला हप्ते सुरु आहेत. कोरोना साथीच्या काळात आर्थिक नियोजन कोलमडले आहे. आर्थिक स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल. मासिक हप्त्यासाठी संबंधित कंपन्यांचे फोन येतात. त्याचा मनस्ताप होतो. हे सगळं असतानाच प्रत्येक गोष्टींचे भाव वाढले आहेत.

किराणा मालापासून ते मांसाहार, इतर वस्तूसाठी आता जास्त पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे आर्थिक नियोजन आणखी बिघडले असून अनेकांचे कोरोनाकाळात कपात झालेले पगारही नियमित झालेले नाहीत. याबाबत शासन पातळीवर तोडगा निघणे आवश्यक आहे. अन्यथा हलाखीत दिवस काढणा-या सर्वसामान्य नागरिकांची अवस्था आणखी दयनीय होईल.’ – अरविंद डोंगरे – सर्वसामान्य नागरिक

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.