Pimpri News : महापालिका आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकली, भाजप नगरसेविका पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – कासारवाडीत गणेशोत्सवात रस्ते खोदई केली जात असल्याने रहदारीला अडथळा ठरत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी आज (गुरुवारी) आंदोलन करत आयुक्त राजेश पाटील यांच्या नामफलकावर शाई फेकली. प्रशासनाचा निषेध केला. शाई फेकल्याने पोलिसांनी नगरसेविका शेंडगे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

कासारवाडी-दापोडी प्रभागाचे आशा शेंडगे प्रतिनिधीत्व करतात. कासारवाडीत भूमिगत गटारांची कामे सुरु आहेत. त्यासाठी रस्ते खोदाई केली आहे. आता पुन्हा स्मार्ट सिटीसाठी खोदाई केली जाणार आहे. उद्यापासून गणेशोत्सव सुरु होत आहे. गौराई आहे. त्यामुळे खोदाई करु नये. गणेशोत्सवानंतर खोदाई करावी. जेणेकरुन गणेशोत्सवात नागरिकांना रहदारीला अडथळा होणार नाही. याबाबत त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली होती. त्यावर आयुक्तांनीही गणेशोत्सावानंतर खोदाई करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्याची ग्वाही दिली होती.

उद्यापासून गणेशोत्सव सुरु होत असताना आजपासून खोदाई सुरु केली. स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदाई केली जात आहे. याबाबत स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांना विचारले असता हे काम सुरु होईलच असे त्यांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या नगरसेविका शेंडगे यांनी महिलांसह महापालिका भवन गाठले.

पहिल्या मजल्यावरील भालकर यांच्या दालनात गेल्या. मात्र, भालकर उपस्थित नसल्याने चौथ्या मजल्यावरील आयुक्त दालनात पोहोचल्या. महिलांनी ठिय्या मांडला. घोषणाबाजी सुरू केली. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या महापालिका मुख्यालयातील दालनावरील नामफलकावर शाई फेकून प्रशासनाचा निषेध केला. शाई फेकल्यामुळे पोलिसांनी नगरसेविका शेंडगे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.