Pimpri News : ‘लॉकडाऊन’मधील टेबल आणि खुर्च्या खरेदीची चौकशी करावी -यश साने

दोषी अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

एमपीसीन्यूज : महापालिका शिक्षण विभागाने भांडार विभागातून जून 2020 मध्ये बालवर्गासाठी टेबल व खुर्च्या खरेदीचा आदेश निलकमल संस्थेला दिला होता. त्यानुसार प्लास्टिक डेस्क, टेबल व खुर्च्या खरेदीपोटी ठेकेदाराला 1 कोटी 86 लाखाचे बिल अदा करण्यात आले. मात्र, कोरोना संकटामुळे लॉकडाऊन लागू असताना साहित्य खरेदीचे आदेश कसे काय दिले ?. तसेच या ठेकेदाराने टेबल व खुर्च्या खरेदी केलेल्या नाहीत. तसेच त्याने कोरोनाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन भ्रष्ट अधिका-यांच्या मदतीने बिल काढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनमधील या खरेदीची सखोल चौकशी कारवाई. त्यात दोषी आढळणाऱ्या महापालिका अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांनी केली आहे.

याबाबत साने यांनी महापालिका आयक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेतील शिक्षण विभागाच्या मागणी प्रस्तावानुसार भांडार विभागाने 5 मार्च 2020ला निलकमल संस्थेला बालवर्गासाठी प्लास्टिक डेस्क, टेबल, खुर्च्या 1000 नग व चार खुर्च्यांसोबत गोल टेबल 2000 नग खरेदी करण्याचा आदेश दिला. त्यानंतर 23 मार्चला कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशात कडकडीत लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी सर्व शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

लॉकडाऊन सुरु असताना मे 2020 मध्ये बालवर्गासाठी प्लास्टिक डेस्क, टेबल, खुर्च्या 1000 नग व चार खुर्च्यांसोबत गोल टेबल 2000 नग आदी साहित्य वाटप करण्यात आले, असे भांडार विभागाकडून सांगण्यात आले. लॉकडाऊनमुळे आपत्कालीन परिस्थितीशी निगडीत खरेदी वगळता अन्य कोणत्याही प्रकारच्या खरेदीला राज्य शासनाने निर्बंध घातले होते.

मग मे 2020 मध्ये संबंधित ठेकेदराने भांडार विभागाला साहित्याचा पुरवठा केल्याचे दाखविले. त्यासाठी निलकमल या ठेकेदाराला 1 कोटी 86 लाखाचे बिल अदा करण्यात आले.मात्र, अशी कोणत्याही साहित्याची खरेदी केली नसल्याचे दिसते.

बालवर्गासाठी वर नमूद साहित्य खरेदी झाली नसेल तर लॉकडाऊन काळात कागदोपत्री खरेदी दाखवून संबंधित ठेकेदाराला 1 कोटी 86 लाख रुपयांचे बिल कसे काय अदा केले?. लॉकडाऊनमध्ये असे साहित्य खरेदी करण्यासाठी कशी काय ऑर्डर दिली ?. हा सर्व प्रकार जनतेच्या डोळ्यात धूळफेकण्याचा आहे. या माध्यमातून करदात्यांच्या कररुपी पैशांवर डल्ला मारण्यात आला आहे.

त्यामुळे मध्यवर्ती भांडार विभागासह या सर्व प्रकारणाची सखोल चौकशी करावी. त्यात जे जे दोषो आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. कुणाचीही गय करु नये. सर्वात महत्वाचे या भ्रष्टाचारामागचा खरा सूत्रधार शोधून त्याच्यावरही कडक कारवाई करावी. महापालिकेतील भ्रष्टाचाराची कीड कायमची नष्ट करण्यासाठी ठोस उपाययोजना कारवाई  कारवाई; अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा साने यांनी निवेदनात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.