Pimpri news: शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांची महापौर, संचालकांकडून पाहणी

स्मार्ट सिटी संचालक दरमहा कामांचा घेणार आढावा

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाच्या स्मार्टसिटी योजने अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या निगडी येथील आस्तित्व मॉलमधील कंट्रोल अँन्ड कमांड सेंटर, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथील एबीडी एरीया या ठिकाणांच्या कामांची आज, गुरुवारी महापौर उषा ढोरे यांच्यासह स्मार्ट सिटी संचालक व अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसेचे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हार्डीकर, अतिरिक्त आयुक्त (३) प्रविण तुपे, जनरल मॅनेजर अशोक भालकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता मनोज शेटीया, रविंद्र पवार आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. अंतर्गत निगडी येथील कंट्रोल अँन्ड कमांड सेंटर मध्ये सी.सी.टी.व्ही., वॉटर मीटर, व्ही.एम.डी. डिस्पले, ट्रॅफिक सिग्नल, पर्यावरण सेन्सॉर, जलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन या विभागांची संपुर्ण माहिती मिळण्यासाठी स्मार्ट नियंत्रण कार्यपद्धती सुरु होणार आहे. हे काम डिसेंबर २०२०मध्ये पुर्ण करुन महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

एबीडी एरीया अंतर्गत पिंपळेगुरव व पिंपळे सौदागर या ठिकाणी स्मार्ट रस्ते, खेळांची मैदाने, स्मार्ट गार्डन, टॉयलेट, पादचारी मार्ग आधुनिक करणे आदी कामांचा यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. या कामांची पाहणीही यावेळी करण्यात आली.

यापुढे दरमहा स्मार्ट सिटी संचालक या कामांचा आढावा घेणार आहे. ही कामे जलदगतीने पूर्ण होऊन ती नागरिकांसाठी खुली करण्यात यावीत, अशा सुचना महापौर ढोरे व संचालकांनी आयुक्त, अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.