Pimpri news: महापालिका आयुक्तांकडून जलपर्णीच्या कामाची पाहणी; लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांमधील जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जलपर्णी काढण्याच्या कामाची पाहणी केली. कामाबाबत समाधान व्यक्त करत काम वेगात पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय, सहाय्यक अधिकारी गणेश देशपांडे यावेळी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी, मुळा या नद्या वाहतात. नदीत सोडण्यात येणारे मैलापाणी, नाल्यांमधील प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णीच्या विस्तारासाठी पोषक वातावरण निर्माण होते. नदीचा नैसर्गिक समतोल ढासळत असून जलजीवसृष्टीवरही दुष्परिणाम जाणवत आहेत.

नदीतील जलपर्णीमुळे शहरातील सर्व नागरिकांना डास आणि कीटकांचा त्रास सहन करावा लागत आहे. डासांची उत्पत्ती होत असून नदीकाठच्या रहिवाशांना मोठा त्रास होत आहे. विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे.

वाढत्या जलपर्णीमुळे महापौर, स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनावर आगपाखड केली होती. जलपर्णी काढल्याशिवाय स्थायीची सभा घेणार नसल्याचे सांगितले. तसेच तत्काळ जलपर्णी काढण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानंतर प्रशासनाने जलपर्णी काढण्याच्या कामाला अधिक गती दिली. ठेकेदारांच्या माध्यमातून पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांमधील जलपर्णी काढण्याचे काम वेगात सुरू आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी जलपर्णीच्या कामाची पाहणी केली.

आयुक्तांनी सांगवी, चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर परिसर, केजुबाई बंधाऱ्यासह जलपर्णी काढण्याचे काम सुरू असलेल्या विविध ठिकाणांची पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी पोकलेनच्या माध्यमातून जलपर्णी काढली जात आहे. काही ठेकेदारांनी जादा पोकलेन मशीन लावल्या आहेत. 40 ते 50 कर्मचारी जलपर्णी काढण्यासाठी आहेत.

सगळीकडे व्यवस्थित काम चालू आहे. आयुक्तांनी या कामाबाबत समाधान व्यक्त केले. कामगारांशी संवाद साधला. तसेच जास्तीत जास्त लवकर जलपर्णी काढावी, अशी सूचना केली. त्यावर लवकरात लवकर जलपर्णी काढण्याची ग्वाही ठेकेदारांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.