Pimpri news: काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी पंधरा इच्छुकांनी दिल्या मुलाखती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी आज (मंगळवारी) तब्बल पंधरा इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. प्रत्येकाने केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. आता पक्ष निरीक्षक कोणाचे नाव पुढे पाठविणार आणि प्रदेश समितीकडून कोणाच्या नावाच्या मोहोर उमटणार याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

सचिन साठे यांनी राजीनामा दिल्याने शहराध्यक्षपद रिक्त झाले आहे. प्रदेश सरचिटणीस आणि पिंपरी – चिंचवडचे पक्ष निरीक्षक राजेश शर्मा आणि नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम झाला.

इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह सकाळपासूनच कार्यालयात आले होते. आपल्याच नेत्याला अध्यक्षपद मिळावे, यासाठी समर्थक सतत घोषणा देत असल्याने प्राधिकरण परिसर दुमदुमून गेला.

यावेळी इच्छुक उमेदवारांना विविध प्रश्न विचारून त्यांची मते आजमावून घेण्यत आली. आता या बाबतचा अहवाल प्रदेश समितीकडे पाठविण्यात येणार आहे. यानंतर मुंबईहून अध्यक्षपदाची घोषणा होईल.

हे आहेत इच्छुक !

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते संदेश नवले, दिलीप पांढारकर, एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, पिंपरी विधानसभा किसान काँग्रेस सभा अध्यक्ष सरिता जामनिक, असंघटित कामगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, माजी शहर युवक अध्यक्ष सचिन कोंढरे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, अशोक काळभोर, रामचंद्र माने, आबासाहेब खराडे, सुदाम ढोरे, रवी खन्ना यांच्यासह पंधरा इच्छुकांनी निरीक्षकांशी संपर्क करून इच्छा व्यक्त केली.

त्यामुळे अध्यक्ष निवडताना कसरत करावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.