Pimpri News: ‘स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करा’ – विलास लांडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित भ्रष्ट अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे. त्यात माजी आमदार लांडे यांनी म्हटले आहे की, स्मार्ट सिटी अंतर्गत 1 हजार कोटी रुपयांची कामे सुरू असून त्यातील असंख्य प्रकल्प विकसित झाल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. परंतु, प्रत्यक्षात एकही मोठा प्रकल्प विकसित झाल्याचे दिसत नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचा कायापालट करण्याचे आश्वासन देऊन सत्ताधाऱ्यांनी शहरातील नागरिकांची फसवणूक केली आहे.

विकास प्रकल्पात काही नामांकित उद्योग समूहांचा सहभाग आहे. वास्तवात मात्र शहर पातळीवर सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा त्यामध्ये सहभाग आहे. त्यांच्यामार्फत उपठेकेदारांकडून ही कामे केली जातात. संबधित उद्योगांकडे ई- लर्निंगचा सुमारे 40 कोटींचा स्मार्ट सिटीचा विकास प्रकल्प असून वास्तवात हे काम इतर उपठेकेदार करत असल्याची चर्चा आहे.

केबल नेटवर्किंग, इंटरनेट, वायफायच्या कामाची खोदाईचे काम सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडे आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी डेटा सेंटर उभारणे, विविध प्रकल्पांसाठी संकेतस्थळे आणि मोबाईल ॲप तयार करणे, पाणीपुरवठा विभागाची संगणकीय प्रणाली पुरवणे, पर्यावरणाची माहिती पुरविणारे विद्युत फलक उभारणे, स्मार्ट पार्किंगची व्यवस्था निर्माण करणे अशा स्वरूपाची कामे एका नामांकित कंपनीकडे आहे. या कामांसाठी संबंधित कंपनीने अनेक स्थानिक पुरवठादार, तंत्रज्ञान पुरवणारे छोटे व्यावसायिक, स्थानिक पातळीवरील ठेकेदार नेमले आहेत. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्याचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचा कायापालट करण्याचे आश्वासन देऊन सत्ताधाऱ्यांनी शहरातील नागरिकांची फसवणूक केली आहे. त्याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लांडे यांनी केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.